ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १४ - चोरीच्या आरोपात अटक झालेला एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली, सुनावणीसाठी चोरट्याला कोर्टात आणले जाते, न्यायाधीशांना हा चोरटा आपला वर्ग मित्र असल्याचे आठवते, न्यायाधीशांनी चोरट्याला आठवण सांगतात त्या चोरट्याला रडू कोसळते व काही क्षणांसाठी कोर्टात झालेली या जुन्या मित्रांची भेट बघून उपस्थितही भावूक होतात.
मियामी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आर्थर बूथ (वय ४९) यां सराईत चोरट्याला अटक केली होती. आर्थरवर चोरी, लुटमार यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर आर्थऱची मियामीतील कोर्टासमोर सुनावणी सुरु झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरु झाली. न्या. मिंडी ग्लॅझऱ यांनी आर्थरला बघितल्यावर त्याला नॉटिलसमधील शाळेत शिकत होता का अशी विचारणा केली. यानंतर आर्थरलाही न्यायाधीश ग्लॅझर या चांगली वर्गमैत्रिण असल्याचे आठवले व त्याला रडू कोसळले. आपल्या जून्या मित्राची ही अवस्था बघून ग्लॅझर यांनाही धक्का बसला. शाळेत तुम्ही हुशार व चांगले होता, पण आता तुम्ही असे कसे झालात, यापुढे तुम्ही चांगले आयुष्य जगाल असे सांगत ग्लॅझर यांनी आपल्या मित्राला भावनिक आधार दिला. न्यायाधीश बोलत असताना आर्थर रडतच होता. न्यायाधीश व चोरट्यातील हा संवाद सर्वांनाच भावूक करुन गेला.