ऑनलाइन लोकमत
दोहा, दि. ८ - एखादा वाघ ट्राफिक जाममध्ये अडकतो आणि वाहनांच्या रांगेत स्वत:ला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असे मजेशीर वाटणारे पण अंगावर शहारे आणणारे दृश्य असलेला व्हिडिओ मंगळवारी सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला. हा फुटेज आॅनलाईन व्हायरल होताच कतार या छोट्याशा आखाती देशाची राजधानी असलेल्या दोहाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास चालविला आहे.
अतिशय वर्दळीच्या दोहा एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या गर्दीत कारच्या मागे वाघ फिरत असतानाचे दृश्य सोशल मीडियावर कुतुहलाचा विषय ठरले. यू-ट्यूब आणि टिष्ट्वटरवरील २० सेकंदाच्या दृश्यात वाघ ट्राफिक लेनमधून धावतानाही दिसतो. तो एका ट्रकमधून पडल्याचे प्रारंभीच्या दृश्यात दिसते. आणखी एका दृश्यात वाघाला सुरक्षित पकडण्यात आल्याचे दिसते. श्रीमंत आखाती देशांमध्ये वाघ पाळणेही असाधारण मानले जात नाही. त्यामुळे हा वाघ पाळलेला तर नव्हता? याचा शोध घेतला जात आहे.