ऑनलाइन लोकमत
हॅम्बर्ग, दि.8- जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी घेतलेल्या उत्स्फुर्त भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचेही समजते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करुन ट्वीट केले आहे. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
जी 20 परिषदेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापुर्वी या दोन्ही नेत्यांनी उत्स्फुर्त संवाद साधला असे पानगगढिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चांसोबत विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत त्याचप्रमाणे जर्मनीच्या चॅन्सलर अॅंजेला मर्केल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांची त्यांनी भेट घेतली. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि अॅंजेला मर्केल यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा करत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते.
अधिक वाचा
त्याचबरोबर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची नरेंद्र मोदी यांच्यासह बैठक होणार नाही असे चीनने स्पष्ट केले होते. मात्र काल पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होऊन त्यांनी हस्तांदोलनही केले आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनंतर या बैठकीचा समारोप करताना, चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सने केलेल्या प्रगतीबद्दल भारताची प्रशंसा केली. ब्रिक्स अध्यक्षपदाचा भारताचा कार्यकाळ संपल्यानंतर, ब्रिक्सचे अध्यक्षपद चीनकडे सोपविण्यात आले आहे.
जी 20 परिषदेमध्ये नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीप्रमाणे दुसरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बैठक होती ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सायबर स्पेस, इंटरनेट, सोशल मीडिया यांचाही हे दहशतवादी सर्रास वापर करत आहेत अशी माहिती सर्वांसमोर ठेवत दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्यांनी 10 सूत्रं जगासमोर ठेवली आहेत. दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं आणि त्याचा बीमोड केला पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत. मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याचं जर्मनीचे चॅन्सलर एंजेला मार्केल यांनीही तोंडभरून कौतुक केले आहे.