‘उपरवाला जब देता है, तो छप्पर फाड के देता है’ ही म्हण आपणास माहिती असेलच. या म्हणीचा प्रत्यय एका परिवाराला नुकताच पॅरिसमध्ये आला. दुसºया महायुद्धाच्या काळात पॅरिसमधील आपल्या घरापासून दूर गेलेला हा परिवार सात दशकांनंतर जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या हाती घबाडच लागले. मॅडम डी. फ्लोरियन ही पारसी धर्मीय महिला दुसºया महायुद्धाच्या काळात पॅरिसमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी तिचे वय अवघे २३ वर्षांचे होते.हिटलरच्या नाझी फौजांनी पॅरिस शहरात प्रवेश केला, तेव्हा अनेक कुटुंबे पॅरिस सोडून अन्यत्र आश्रयास गेली. मॅडम फ्लोरियन यांनीही पॅरिस सोडले. फ्रान्समध्येच दुसºया शहरात त्या राहू लागल्या. त्यानंतर त्या कधीच पॅरिसला परत गेल्या नाहीत. २0१0 मध्ये मॅडम फ्लोरियन यांचा मृत्यू झाला. निरवानिरव करताना त्यांच्या कुटुंबीयांच्या असे लक्षात आले की, मॅडम फ्लोरियन या मृत्यूपर्यंत पॅरिसमधील घराचे भाडे नियमितपणे भरीत होत्या. या प्रकाराने कुटुंबीयांचे कुतूहल जागे झाले. त्यांनी पॅरिसमधील त्या घराला भेट देण्याचा निर्णय घेतला. मॅडम फ्लोरियन यांचा परिवार तब्बल ७0 वर्षांनंतर पॅरिसमधील त्या घरी आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा, आतील दृश्य पाहून ते हैराण झाले.घरातील सर्व जुन्या वस्तू जशाच्या तशा होत्या. घर बंद असल्यामुळे ७0 वर्षांत त्यात काहीही बदल झालेला नव्हता. मात्र, या वस्तू आता व्हिंटेज म्हणजेच पुराणवस्तू बनल्या होत्या. युरोपात अशा पुराणवस्तूंना प्रचंड मागणी आहे. फ्लोरियन परिवाराने या वस्तूंचा लिलाव केला. घरातील एक पेंटिंगच २१ कोटींमध्ये विकले गेले. सर्व वस्तूंच्या विक्रीतून कुटुंबाला कोट्यधीश बनवले.
‘उपरवाला जब देता है, तो छप्पर फाड के देता है’, भाड्याच्या घराने ७0 वर्षांनंतर परिवाराला केले कोट्यधीश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:56 AM