ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 12 - भारतीय वंशाचे अमेरिकी अॅटर्नी प्रीत भरारा यांची शनिवारी (दि. 11) ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली. ओबामा यांच्या प्रशासनात नियुक्त झालेल्या सर्व 46 अॅटर्नींनी राजीनामे द्यावे असे आदेश काढण्यात आले होते. मात्र, आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने त्यांची हकालपट्टी केली.
मी राजीनामा दिला नाही, थोड्यावेळापूर्वी मला काढण्यात आलं. अॅटर्नी म्हणून काम करणं हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठा सन्मान होता असं ट्विट त्यांनी स्वतःच केलं. प्रीत भरारा यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली होती परंतु आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
नोव्हेंबरमध्ये ट्रम्प विजयी झाल्यानंतर भरारा यांनी त्यांची भेट घेतली होती. य भेटीनंतर भरारा यांनी राजीनामा देऊ नये असं ट्रम्प यांनी सांगितल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आलं होतं.I did not resign. Moments ago I was fired. Being the US Attorney in SDNY will forever be the greatest honor of my professional life.— Preet Bharara (@PreetBharara) March 11, 2017
प्रशासनात एकसूत्रता यावी म्हणून ओबामा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या अॅटर्नींना काढून टाकावे अशी सूचना महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी केली होती. अमेरिकेमध्ये एकूण ९३ अॅटर्नी आहेत. त्यापैकी केवळ ४६ जण सध्या काम करत होते. काही जणांनी याआधीच आपले राजीनामे दिले होते.