वॉशिंग्टन : अमेरिकेने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा खात्मा झाला. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचा कट अल-जवाहिरी व ओसामा बिन लादेन या दोघांनी केला होता. लादेनला अमेरिकी सैनिकांनी २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी अल-कायदाचा म्होरक्या बनला होता.
इजिप्शियन शल्य चिकित्सक असलेल्या ७१ वर्षीय जवाहिरीवर २.५ कोटी डॉलरचे बक्षीस होते. सुरुवातीला लादेनच्या नेतृत्वाखाली त्याने काम केले. नंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून अल-कायदाचे नेतृत्व केले. २०११ मध्ये लादेन मारला गेल्यानंतर जवळपास ११ वर्षांनी जवाहिरीचा खात्मा झाला. जवाहिरीला संपवण्यासाठी हल्याची परवानगी दिली होती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये सोमवारी सायंकाळी सांगितले. जवाहिरी एका इमारतीच्या बाल्कनीत उभा होता. तेव्हा ड्रोनद्वारे त्याच्यावर दोन क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. इमारतीत जवाहिरीचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, त्यांना काहीही इजा झाली नाही. (वृत्तसंस्था)
कुठेही लपून बसा, तुम्हाला शोधून काढूच ‘९/११ च्या कारस्थानात त्याची महत्त्वाची भूमिका होती. अमेरिकेतील या हल्ल्यात २९७७ लोक ठार झाले होते. अनेक दशके तो अमेरिकन नागरिकांविरुद्ध हल्ल्याचे कट करत होता,’ असे बायडेन म्हणाले. ‘जे आम्हाला हानी पोहोचवू इच्छितात, त्यांच्यापासून आमच्या नागरिकांचे रक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. भले तुम्ही कुठेही लपून बसा, अमेरिका तुम्हाला हुडकून काढून ठार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे बायडेन यांनी म्हटले आहे. गुप्तचर विभागाला यावर्षीच्या सुरुवातीलाच जवाहिरीचा ठावठिकाणा लागला होता. तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काबूलला गेला होता. २००१ मधील हल्ल्याचे घाव सोसलेल्या कुटुंबांना आता कुठे शांतता लाभली असेल.