मुंबई - iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. 3 ऑक्टोबरला भारतात iPhone x ची विक्री सुरू होईल त्यामुळे iPhone 8 ला प्रतिसाद कमी असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय iPhone 8 Plus फुटण्याचे देखील रिपोर्ट्स आले आहेत. iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडलीये. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
द सनने याबाबत वृत्त दिलं आहे. एका कस्टमरने iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यान iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा कस्टमरने केला आहे. तायवानमध्ये ही घटना घडली आहे. दूसरी घटना जपानमध्ये घडली आहे. फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असता iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेलं पाहिलं असा दावा कस्टमरने केला आहे.
अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं.
iPhone फुटण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी देखील अशा बातम्या आल्या होत्या. पण अशा घटना क्वचितच होत असतात . बॅटरी खराब असल्यामुळे हे प्रकार घडत असतात. सॅमसंगलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. खराब बॅटरीमुळे Galaxy Note 7 चं प्रोडक्शन कायमचं बंद करण्यात आलं होतं. अॅपलसोबत घडलेली घटना वेगळी आहे पण दोन्हीमध्ये फोनची बॅटरी समान धागा आहे.