Karoline Leavitt Dress: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालंय. दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेल्या टॅरिफचा परिणाम जागतिक व्यापारावर होताना पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतल्याने चीननेसुद्धा जशाच तसे प्रत्युत्तर दिले आहे. जेवढं आयात शुल्क अमेरिकेने चिनी वस्तूंवर लादलं, तेवढंच आयात शुल्क चीननं अमेरिकन वस्तूंवर लादलं आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्यामुळे अमेरिकेची फजिती झाल्याचे म्हटलं जात आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचा एक फोटो व्हायरल होत असून त्यावरुन अमेरिकेला ट्रोल केले जात आहे.
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध आता सोशल मीडियावर आले आहे. दोन्ही देशांचे सोशल मिडिया युजर्स एकमेकांवर निशाणा साधत आहेत. अशातच व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचा चिनी पोशाख घातलेला फोटो व्हायरल झाला आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान, चिनी राजदूताने कॅरोलिन लेविट यांनी चीनमध्ये बनवलेला ड्रेस घातल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प आणि कॅरोलिन लेविट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
इंडोनेशियाच्या डेनपासार येथील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे राजदूत झांग झिशेंग यांनी २७ वर्षीय लेविट यांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी काळ्या रंगाचा लेस असलेला लाल ड्रेस घातला होता. झांग झिशेंग यांच्या पोस्टसोबत चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वेइबोचा एक स्क्रीनशॉट देखील होता ज्यामध्ये लेविट यांच्या ड्रेसवरील लेस चीनमधील माबू येथील एका कारखान्यात बनवण्यात आल्या आहेत. यावरुन टीका करताना झांग यांनी "चीनवर टीका करणे हा अमेरिकेचा व्यवसाय आहे, पण चीनच्या वस्तू खरेदी करणे हे त्यांचे आयुष्य आहे," असं म्हटलं.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. अनेकांनी लेविट यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. एकीकडे अमेरिका चीनविरुद्ध कठोर कारवाई करते आणि दुसरीकडे चीनमध्ये बनवलेल्या उत्पादनांचा वापर करते, असे एका नेटकऱ्याने म्हटलं. लेविट चिनी ड्रेस घालून 'मेड इन चायना' वर टीका करत आहे, हा किती मोठा ढोंगीपणा आहे, असेही एका नेटकऱ्याने म्हटलं. आणखी एका युजरने, हा जुन्या राजकारण्यांचा खेळ आहे चीनला दोष द्यायचा, पण तिथून स्वस्त वस्तू मागवायच्या, असे म्हटले.
दरम्यान, आता अमेरिका-चीनमधील व्यापार वाद हा केवळ सरकारांमधीलच नाही तर लोकांमध्ये आणि सोशल मीडियावरही मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.