नवी दिल्ली : फेक न्यूजमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी व्हॉटस्अॅपने यापूर्वीच भारतात मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा ठरवून दिली आहे. हीच मर्यादा आता व्हॉटस्अॅपकडून जागतिक स्तरावर राबविली जाणार आहे.भारतात गतवर्षी जमावांकडून हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. यामागे व्हॉटस्अॅपचे फेक मेसेज असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी क्रिस डॅनियल यांनी भारताचा दौरा केला होता. व्हॉटस्अॅपमध्ये फॉरवर्डची सुविधा आहे.
या माध्यमातून पूर्वी एकच मेसेज, व्हिडिओ अनेक जणांना पाठविता येत होता. पण, या घटनानंतर सरकारने व्हॉटस्अॅपवर दबाव आणला. आयटी विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटस्अॅपला स्पष्ट केले की, अशा फेक मेसेजवर नियंत्रण आणावे. देशात व्हॉटस्अॅपचे २०० मिलियनपेक्षा अधिक युजर्स आहेत. सरकारने कंपनीला स्पष्ट निर्देश दिले की, त्यांनी नियमांचे पालन करावे लागेल. त्यानंतर भारतात मेसेज पाठविण्यावर मर्यादा आली. आता एका वेळी युजर पाच जणांना मेसेज पाठवू शकतो.मेक्सिकोमध्येही गैरप्रकारभारतातील मॉब लिचिंगच्या घटनेनंतर अशाच प्रकारच्या घटना मेक्सिकोत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्हॉटस्अॅपने मेसेजची मर्यादा पूर्ण जगात लागू करण्याचे ठरविले आहे. व्हॉटस्अॅपने याची अंमलबजावणी केल्यानंतर आता जगात कोठेही एक युजर एका वेळी पाचपेक्षा अधिक जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही. अर्थात, व्हॉटस्अॅपकडून अधिकृतपणे याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.