Kamal Khera Anita Anand, Ministers in Canada Government: कॅनडा सरकारमध्ये काही काळापासून अस्थिरता होती. त्यानंतर अखेर तेथे सत्तापालट झाला आणि जस्टिन ट्रुडो सरकारचा अंत झाला. आता कॅनडामध्ये लिबरल पक्षाचे नेते मार्क कार्नी यांचे सरकार असून ते कॅनडाचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी त्यांनी कॅनडाचे २४वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोन महिलांचा समावेश करणयात आला आहे. अनिता आनंद आणि कमल खेरा अशी दोघींची नावे आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मंत्रालयाबद्दल...
कोण आहेत कमल खेरा?
कमल खेरा या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक आहेत. त्यांना सध्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खेरा या पहिल्यांदा २०१५ मध्ये ब्रॅम्प्टन वेस्टमधून खासदार झाल्या. उच्च शालेय शिक्षणासाठी त्या कॅनडाला गेल्या. खेरा या टोरंटो येथील यॉर्क विद्यापीठातून विज्ञान शाखेच्या पदवीधर झाल्या. आरोग्यमंत्री झाल्यानंतर खेरा म्हणाल्या की, एक नर्स म्हणून काम करताना रुग्णांना बरे करणे हेच माझे सर्वोच्च प्राधान्य असते. आरोग्यमंत्री असतानाही मी याच तत्त्वाचा अवलंब करेन.
कोण आहेत अनिता आनंद?
अनिता आनंद यांचे आईवडील दोघेही भारतीय डॉक्टर होते. ६० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांचे पालक नायजेरियात राहत होते. अनिता आनंद यांचा जन्म २० मे १९६७ रोजी त्याच देशातील नोव्हा स्कॉशियामध्ये झाला. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ५८ वर्षीय अनिता आनंद यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते. पण जानेवारी महिन्यात त्यांनी माघार घेतली. सध्या त्या नव्या सरकारमध्ये विज्ञान आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार पाहत आहेत. अनिता या सर्वप्रथम २०१९ मध्ये ओकव्हिलमधून संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. कार्नी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर अनिता म्हणाल्या की, कॅनडा एकजूट आणि मजबूत आहे. कॅनेडियन अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण कामाला लागूया.