मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉलचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम यांनी म्युनिकमधील एका सुरक्षा संमेलनात एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
भले आज परिस्थिती कोरोना विषाणूच्या आणखी धोकादायक व्हेरिएंटसाठी आदर्शवत बनली आहे. पण कोरोना महामारीचा शेवट तेव्हाच होईल, जेव्हा आपल्याला या संकटाचा खात्मा करायचा असेल, असं डॉ. टेड्रोस म्युनिकमधील संमेलनातील लाईव्ह सेशनदरम्यान म्हणाले. संपूर्ण जगाला केवळ महामारीचा खात्मा करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीला सुरुवात झाली. त्यावेळी आपण या विषाणूच्या प्रसारानं चिंतेत होतो. आता आपण महामारीच्या तिसऱ्या वर्षात आहोत. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचे अधिक संक्रामक व्हेरिएंट तयार होऊ शकतात. मात्र आपण याच वर्षी महामारीचा खात्मा करू शकतो, असं डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं.
यावेळी डॉ. टेड्रोस यांनी लसीकरणावरही भाष्य केलं. काही देशांमध्ये लसीकरण चांगलं झालंय, तिथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका कमी झाला आहे. आता कोरोना संपला अशी तिथल्या लोकांची मानसिकता झालीय. पण तसं नाहीए, असं डॉ. टेड्रोस म्हणाले.