जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तसेच पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मी सेल्फ क्वारंटाईन केलं आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. "मी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे" असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
"आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असं केले तरच आपण कोरोना संसर्गाची ही साखळी तोडू शकतो व कोरोनावर मात करू शकतो. तसेच आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. युरोपमध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून ब्रिटननेही येत्या गुरुवारपासून महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, जर्मनीसह काही देशांनी याआधीच दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन अंमलात आणला आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शाळा व विद्यापीठे सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता पब, रेस्टॉरंट व अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं बेतलं जीवावर
कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेत सर्वात मोठी निवडणूक आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना महागात पडलं आहे. तब्बल 30,000 जणांना कोरोनाची लागण झाली असून 700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका रिसर्चमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या रॅलीमुळे आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.
30,000 जणांना कोरोनाची लागण, 700 जणांचा मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत 18 रॅली निघाल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे. रिसर्चमधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींचा मृत्यूही झाला. ट्रम्प यांच्या 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान झालेल्या रॅलीमधून ही माहिती समोर आली आहे.