टोकियो - सिगारेट शरीरासाठी हानिकारक असल्याचं माहित असून देखील अनेकजण सिगारेटचं सेवन करतातच. त्यामुळे कर्मचा-यांना धूम्रपानाचे व्यसन सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जपानधील पिआला इन्कॉर्पोरेटेट या मार्केटिंग कंपनीने धूम्रपान न करणा-यांना वर्षाला सहा दिवसांची जादा भर पगारी रजा देण्याची पद्धत सुरु केली आहे. सोमवारपर्यंत कंपनीच्या 120 पैकी 30 कर्मचा-यांनी या जादा रजेचा फायदा घेतला.
कंपनीचे कार्यालय 29 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे कामाच्या वेळात धूम्रपान करणा-या कर्मचा-यांना त्यासाठी खाली बेसमेंटमध्ये जावे लागते. धुम्रपानाच्या अशा प्रत्येक ‘ब्रेक’साठी ते सरकारी 15 मिनिटांचा वेळ घेतात. दिवसातून दोन वेळा धूम्रपान करायचे म्हटले तरी त्यासाठी त्यांना कामाचा अर्धी तास खर्ची घालावा लागतो.
कंपनीचे प्रवक्ते हिरोताका मात्सुशिमा म्हणाले की, धूम्रपान करणा-यांपेक्षा आम्हाला जास्त काम करावे लागते, अशी तक्रार धूम्रपान न करणा-या एका कर्मचा-याने कंपनीच्या सूचनापेटीत टाकली. कंपनीचे सीईओ तकाओ असुका यांनी त्यावर विचार केला आणि धूम्रपान करणा-यांना दंडित करण्याऐवजी न करणा-यांना बक्षिशी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या सहा जादा भरपगारी रजेची सुरुवात झाली. याचा परिणाम म्हणून चार कर्मचा-यांनी आत्तापर्यंत धूम्रपान करणे सोडून दिले आहे, असेही ते म्हणाले.जागतिक आरोग्य संघटनेनुसार जपानमधील 21.7 टक्के प्रौढ नागरिकांना धूम्रपानाचे व्यसन आहे. पुरुष आणि वृद्धांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक आहे.