जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनेक देशात कोरोना लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दोन लसी घेतलेल्या काही नागरिकांना तिसरा डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनमध्ये देण्यात येत असलेल्या लसींबाबत WHO ने हा सल्ला दिला आहे. चीनमधील सायनोवॅक (Sinovac) आणि सायनोफार्म (Sinopharm) या लसी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोलाचा सल्ला आहे.
चीनमधील सायनोवॅक (Sinovac) आणि सायनोफार्म (Sinopharm) या लसी चीनमधील अनेक नागरिकांनी घेतलेल्या आहेत. मात्र या लसींची परिणामकारकता इतर लसींच्या तुलनेत मर्यादित असल्याचं संशोधनातून आता समोर आलं आहे. विशेषतः 60 वर्षांवरूल म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांवर त्या ठराविक काळापुरत्याच प्रभावी राहतात आणि लवकरच त्यांचा प्रभाव ओसरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच इतर आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या लसीचा तिसरा डोस टोचून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संशोधनात चीनमधल्या दोन लसी कमी प्रभावी
काही महिन्यांपूर्वी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीच या कोरोनी लसी कमी प्रभावी असल्याचं सांगत सरकारने यावर काम करण्याचा सल्ला दिला होता. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे नागरिकांना मिळणारं संरक्षण हे मर्यादित असल्याचं म्हटलं होतं. लसीकरण मोहिमेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी वापरण्याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जगातील वेगवेगळ्या देशांत संशोधन करण्यात आलेल्या लसींपैकी चीनमधल्या या दोन लसी कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
चीनसाठी मोठा झटका
गाओ यांचं हे विधान चीनसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जातं. चीनने वॅक्सीन स्ट्रेटजी अंतर्गत जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने लसीचा पुरवठा केला होता. चीनमधील सिनोवॅक आणि सिनोफार्म या लसींचं वितरण आतापर्यंत मेक्सिको, टर्की, इंडोनेशिया, हंगेरी, ब्राझील आणि तुर्की यासारख्या देशांमध्ये करण्यात आलं आहे. या देशातील ज्या नागरिकांनी चिनी लसींचे डोस घेतले असतील, त्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता तिसरा डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.