नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलेले पण मूळचे भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांचा गणिताचे नोबेल अशी ख्याती असणाऱ्या फिल्डस मेडलने गौरव करण्यात आला आहे. यावेळेस जगातील चार गणितींचा या पदकाने सन्मान केला गेला असून त्यामध्ये अक्षय यांचा समावेश आहे. हे पदक स्वीकारणाऱ्या अक्षय व्यंकटेश यांचे वय केवळ 36 वर्षे आहे. फिल्ड पदक मिळवणारे ते दुसरे ऑस्ट्रेलियन आहेत.
अक्षय व्यंकटेश यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला असून ते डायनामिक्स थिअरीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत. अक्षय दोन वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल पर्थमध्ये स्थायिक झाले. अगदी लहानपणापासून त्यांची विज्ञानक्षेत्रातील प्रगती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अगदी अल्पकाळामध्ये ते गणितातील संशोधक म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापिठात वयाच्या 13 व्या वर्षीच प्रवेश मिळवणारे ते सर्वात लहान विद्यार्थी म्हणून ओळखले गेले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवी संपादन केली. असे करणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी पी.एचडी पदवी संपादित केलीय त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये प्रवेश घेतला. तेथे संशोधनकार्य केल्यानंतर ते आता स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक आहेत.
अक्षय व्यंकटेश यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यात इन्फोसिस प्राइज, सालेम प्राइज, शास्त्र रामानुजन प्राइज यांचा समावेश आहे. अक्षय व्यंकटेश यांची आई श्वेता व्यंकटेश संगणकशास्त्राच्या प्राध्यापक असून त्या डेकिन विद्यापिठामध्ये सेंटर फॉर पॅटर्न रेकग्निशन अँड डेटा अनालिटिक्स विभागाच्या संचालिका आहेत.