पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम अमेरिकेतील ह्युस्टन येथे जल्लोषात पार पडला आहे. या हाऊसफुल्ल कार्यक्रमाचं आयोजन हर्षवर्धन श्रृंगला यांनी केलं होतं. अमेरिकेचे भारतीय राजदूत म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. डिसेंबर 2018 मध्ये त्यांची अमेरिकेतील राजदूत पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी ते बांग्लादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून पदावर कार्यरत होते.
हर्षवर्धन श्रींगला यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट इस्टिफेंस महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर, युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर ते सन 1984 मध्ये आयएफएस अधिकारी म्हणून भारतीय सेवेत नियुक्त झाले. श्रृंगला यांनी दिल्लीसह, पॅरिस, अनोवा आणि तेल अवीवमध्ये भारताच्या मोहिमांमध्ये विविध पदांवर कामकाज पाहिलं आहे. UNGA बैठकीनंतर दुसऱ्यांचा नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीचं आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलं होतं.
मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमादरम्यान भारत आणि अमेरिकेत 7.5 बिलियन्स डॉलरचा वीज उत्पादनासंदर्भातील करार झाला आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमाची भारत-अमेरिकेसह देशभरात चर्चा झाली. या कार्यक्रमात मोदींनी अमेरिकेतील सर्वच भारतीयांच्या प्रादेशिक अस्मित जपली. Howdy Modi या प्रश्नावर उत्तर देत ''सगळं काही ठीक आहे'' असे म्हणत मोदींनी मराठीजनांशीही संवाद साधला. तसेच, अमेरिकेत देशातील विविध भाषांचा गजर केला. त्यामुळे विविध राज्यातील एकत्र आलेल्या भारतीयांना आपल्या भाषेच्या अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न मोदींनी केला. या दौऱ्यात मोदींनी 17 सदस्यांच्या काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाची येथे विशेष भेट घेऊन प्रत्येकासाठी असेल असा ‘नवा काश्मीर’ उभारण्याचे आश्वासन त्यांना दिले. या शिष्टमंडळात अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांचा समावेश होता
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्युस्टनला ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी जाताना टष्ट्वीट केले. ‘ह्युस्टनमध्ये माझ्या मित्राबरोबर (नरेंद्र मोदी यांच्यासमवेत) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहे. टेक्सासमध्ये हा एक चांगला दिवस असेल’, असे ट्विटमध्ये म्हटले. ट्रम्प यांच्या या ट्विटला उत्तर देताना मोदी यांनीही ट्विट केले. ‘खरोखरच हा चांगला दिवस असेल. तुमच्या भेटीची वाट पाहत आहे’, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.