Ukraine Russia War: रशियाला एकटीनं हादरवणारी कोण ही मीना? इनमिन तीस वर्षांचं आयुष्य जगली, केजीबीने काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:28 AM2022-03-11T08:28:31+5:302022-03-11T08:29:00+5:30

मीनाला या जगातून जाऊन आज ३५ वर्षे उलटली आहेत. तरीही लोकांच्या मनात अजूनही ती का जागी आहे? असं काय केलं होतं तिनं की, लोकांनी आजही तिची आठवण काढावी? ती आजही प्रसिद्ध आहे.

Who is Meena who is shaking Russia alone? women of Afghanistan who expose russia in France in front of world | Ukraine Russia War: रशियाला एकटीनं हादरवणारी कोण ही मीना? इनमिन तीस वर्षांचं आयुष्य जगली, केजीबीने काटा काढला

Ukraine Russia War: रशियाला एकटीनं हादरवणारी कोण ही मीना? इनमिन तीस वर्षांचं आयुष्य जगली, केजीबीने काटा काढला

googlenewsNext

मीना केश्वर कमाल. कोण आहे ही महिला?  जगभरातल्या अनेकांना ती आजही माहीत नाही, पण अफगाणिस्तानातल्या महिलांना विचारा.. त्यातल्याही अनेकींनी तिला कधी पाहिलं नाही, पण तिचं नाव काढलं की, आजही त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि तिच्याप्रति उर अभिमानानं भरुन येतो. ‘मार्टर्ड मीना’ (शहीद मीना) या नावानं अफगाणिस्तानात ती आजही प्रसिद्ध आहे. 

मीना. २७ फेब्रुवारी १९५६ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं तिचा जन्म झाला. काबूल युनिव्हर्सिटीत तिनं शिक्षण घेतलं. तरुण वयातच सामाजिक चळवळीत तिनं उडी घेतली आणि चार फेब्रुवारी १९८७ रोजी ती मृत्युमुखीही पडली. इनमिन तीस वर्षांचं आयुष्य तिला मिळालं. पाकिस्तानातील क्वेट्टा या शहरात रशियाची गुप्तहेर संघटना ‘केजीबी’नं तिची हत्या केली असं मानलं जातं. मीनानं अफगाणिस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशनचा नेता फैज अहमद याच्याशी लग्न केलं होतं. अफगाणिस्तानातील कट्टरपंथीयांनी १२ नोव्हेंबर १९८६ मध्ये त्याचीही हत्या केली होती. त्याच्या हत्येच्या तीन महिन्यांच्या आतच मीनालाही संपवण्यात आलं.

‘टाईम’ या जगप्रसिद्ध मासिकानं १३ नोव्हेंबर २००६ रोजी ‘सिक्स्टी एशियन हिरोज’ या शीर्षकाखाली एक विशेषांक प्रकाशित केला होता. त्यातही मीनावर एक दीर्घ लेख होता.. बहुसंख्य अफगाणी महिलांना अजूनही जनावरांचं जिणं जगावं लागत असलं, तरी तिथल्या महिलांमध्ये स्वातंत्र्याची, समानतेची आणि क्रांतीची बिजं रोवण्यात मीनानं कळीची भूमिका बजावली होती, या शब्दांत या लेखात तिचा सन्मान करण्यात आला होता..

मीनाला या जगातून जाऊन आज ३५ वर्षे उलटली आहेत. तरीही लोकांच्या मनात अजूनही ती का जागी आहे? असं काय केलं होतं तिनं की, लोकांनी आजही तिची आठवण काढावी? 
याचं कारण आहे युक्रेन आणि रशिया युद्ध. रशियानं युक्रेनवर केला, तसाच हल्ला १९७९ मध्ये तत्कालीन सोविएत रशियानं अफगाणिस्तानवरही केला होता. आपल्या पसंतीचं कम्युनिस्ट सरकार त्यांना तिथे सत्तेवर बसवायचं होतं. तेव्हा महिलांना संघटित करण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि रशियनांना अफगाणिस्तानबाहेर हाकलण्याची मोहीम मीनानं राबवली होती. केवळ महिलांमध्येच नाही, तर संपूर्ण अफगाणिस्तानात मीना प्रचंड लोकप्रिय होत होती, अफगाणिस्तानची प्रतिनिधी, ‘बुलंद तोफ’ म्हणून जगभरातून तिला बोलावणंही यायला लागलं होतं. फ्रान्स सरकारच्या बोलवण्यावरुन मीना एकदा तिथे एका आंतरराष्ट्रीय संमेलनाला गेली होती. या संमेलनात रशियन प्रतिनिधीही सामील होते. पण, मीनानं थेट मंचावरुनच रशियाचे वाभाडे काढले. रशियन आक्रमणात अफगाणमध्ये जे हजारो लोक मेले त्याबद्दल रशियाला जबाबदार ठरवताना त्यांना खडे बोल सुनावले. यामुळे नाराज झालेले सोविएत रशियाचे प्रतिनिधी संमेलन सोडून सभागृहातून निघून गेले होते. अशा गोष्टींनी हादरलेल्या रशियानं मग मीनाचा कायमचा काटा काढला..

अफगाणी महिलांना स्वत:चा आवाज देण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी तरुण मीनानं कोणाचाही मुलाहिजा कधी बाळगला नाही. मोठ्या हिमतीनं तिनं साऱ्यांना टक्कर दिली. महिलांच्या सन्मानासाठी ती कायम लढत राहिली. तिच्याप्रति कृतज्ञता म्हणून आजही अफगाणिस्तानात प्रदर्शनं केली जातात. आज रशिया युक्रेनची मान पिरगाळत असताना, एका तरुण अफगाणी मुलीनं काही वर्षांपूर्वी एकटीनं रशियाच्या कसे नाकीनऊ आणले होते, त्यांना सळो की पळो करताना नाक रगडायला लावलं होतं, याची आठवण रशियनांना व्हावी, त्यांना खिजवावं म्हणून आजही मीनाचे फोटो असलेले फलक अफगाणिस्तानात फडकावले जाताहेत. 

मीनाचा जन्म एका रुढीवादी घरात झाला होता. आपल्या दोन्ही आयांना बापाकडून मरेस्तोवर मार खाताना तिनं लहानपणापासूनच पाहिलं होतं. त्याचवेळी तिनं ठरवलं होतं, महिलांची ही परिस्थिती मी बदलेन. मीनानं कायद्याचं शिक्षण सुरू असतानाच ‘रावा’ (रिवोल्युशनरी असोसिएशन ऑफ द विमेन ऑफ अफगाणिस्तान) या संघटनेची स्थापना केली. येथील महिलांसाठी झटून काम केलं पाहिजे हे लक्षात येताच तिनं कायद्याचं शिक्षण अर्धवटच सोडलं आणि पूर्ण वेळ संघटनेसाठी स्वत:ला वाहून घेतलं. महिलांसाठी ‘पयाम-ए-जान’ नावाचं एक मासिकही तिनं सुरू केलं होतं. त्यातून सोविएत रशिया आणि कट्टरपंथीयांना झोडपण्याचं कामही ती करीत होती..

‘मीना’च्या कार्यकर्त्यांवरही मृत्यूचं भय !
अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर महिलांचे सारे अधिकार पुन्हा एकदा काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे मीनानं स्थापन केलेल्या ‘रावा’ या संघटनेच्या महिला आता तिथे भूमिगत राहून काम करीत आहेत. या संघटनेच्या महिलांच्या शोधात तालिबान आहे. यातली एखादी जरी महिला सापडली तरी तिला कठोर शिक्षेला सामोरं जावं लागतं. मृत्यूचं भय डोक्यावर असूनही या महिला हिमतीनं काम करीत आहेत.

Web Title: Who is Meena who is shaking Russia alone? women of Afghanistan who expose russia in France in front of world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.