Who is Melanie Joly: जगातील बलाढ्य देशांच्या यादीत अमेरिका आणि चीन या देशांचा नेहमीच नंबर लागतो. शस्त्रास्त्रे आणि आर्थिक सुबत्ता अशा दोन्ही क्षेत्रात या दोन देशांचा बोलबाला असल्याने इतर देशांवर वचक ठेवण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न असतो. पण सध्या त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी बड्या देशांच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर टीका करत असतात. त्यातच आता आणखी एका महिला नेत्याची चर्चा रंगली आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांच्याबद्दल सध्या युरोपपासून अमेरिका आणि आशिया खंडापर्यंत चर्चा सुरू आहे. मेलानी जोली यांनी पत्रकार परिषदेत चीनवर गंभीर आरोप केले आहेत.
मेलानी काय म्हणाल्या?
एका आठवड्यापूर्वी मेलानी जोली यांनी पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत कोणताही अमेरिकन सुरक्षित नाही, असे जोली म्हणाल्या. मेलानीनेही ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनिंगवरही जोरदार हल्लाबोल केला. ट्रम्प यांच्यावर रोखठोक शब्दांत टीका केल्यानंतर, मेलानी यांनी चीनवरही सडेतोड हल्लाबोल केला आहे. मेलानी यांनी चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावरून मत मांडले. तसेच याबाबत संपूर्ण जगाने सावध राहणे गरजेचे असल्याचेही म्हटले. तसेच, जोली म्हणाल्या की चीनने चार कॅनेडियन नागरिकांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली फाशी दिली. चीनने फाशीची शिक्षा देताना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केले नाही.
कोण आहेत कॅनडाच्या मेलानी जोली?
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली ४६ वर्षांच्या आहेत. जोली यांनी २०१३ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन २०१५ मध्ये त्या पहिल्यांदाच कॅनेडियन संसदेच्या सदस्य बनल्या. कॅनडाच्या राजकारणात मेलानी जोली जस्टिन ट्रुडो यांच्या जवळच्या मानल्या जातात. मेलानी यांना ट्रुडो यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे पद मिळाले होते. जोली धाडसी भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. मेलानी जोली यांनी आतापर्यंत तीन वेळा कॅनेडियन संसदेच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी तिन्ही निवडणुका जिंकल्या आहे. राजकारणात येण्यापूर्वी जोली या व्यवसायाने वकील होत्या. त्यांनी कॅनडाच्या पर्यटन विभागातही काम केले आहे.
कॅनडाच्या राजकारणात जोली यांना पंतप्रधानपदाच्या दावेदार मानले जात होते. परंतु त्यांनी टॅरिफच्या मुद्द्यावर लढाई लढण्यासाठी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यानंतर मार्क कार्नी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी देण्यात आली.