Who is Mojtaba Khamenei? : जगातील सर्वात मोठ्या इस्लामिक देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी अचानक आपला मुलगा मोजतबा खामेनेई यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा निर्णय म्हणजे इराणची पवित्र शासन व्यवस्था (विलायत-ए-फकीह) आणि देशाच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. त्यामुळे आपण मोजतबा खामेनेई यांच्याविषयी जाणून घेऊया...
मोजतबा खामेनेई हे अयातुल्लाह अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र आहेत. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९६९ रोजी इराणमधील मशहद येथे झाला. त्यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले आणि १९९९ मध्ये मौलवी बनण्याचा अभ्यास केला. तसेच, धार्मिक आणि राजकीय व्यक्ती म्हणून मोजतबा खामेनेई यांची ओळख आहे. मोजतबा खामेनेई हे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या कार्यालयात कमांडिंग ऑफिसरची भूमिका बजावतात. त्यांना आपल्या वडिलांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून स्थान देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर, मोजतबा खामेनेई हे एकमेव व्यक्ती आहेत, जे उत्तराधिकाराचे सर्वोच्च दावेदार आहेत.
Britanica च्या अहवालानुसार, मोजतबा खामेनेई १९८७ मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर IRGC मध्ये सामील झाले. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या काळात त्यांनी काम केले. तोपर्यंत युद्धाने इराणला उद्ध्वस्त केले होते. युद्ध चालू ठेवून इराकवर विजय मिळवता, येईल अशी सरकारला आशा होती, परंतु १९८८ मध्ये इराकने युद्धात आपली पकड मजबूत केली. यामुळे इराणला त्याच वर्षी जुलैमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धविराम स्वीकारावा लागला होता.
२१ व्या शतकाच्या सुरूवातीस, मोजतबा खामेनेई यांनी केवळ IRGC मध्येच नव्हे तर इराणच्या सर्वोच्च धर्मगुरूंशीही मजबूत संबंध विकसित केले होते. सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयातील त्यांच्या सहभागामुळे त्यांचे शक्तिशाली नेटवर्क आणखी वाढले. २००९ मध्ये इराणमधील सरकारविरोधी निदर्शने दडपण्यात मोजतबा खामेनेई यांनी मोठी भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांची कट्टरपंथी नेतृत्वाची प्रतिमा निर्माण झाली. तसेच, त्यावेळी ते पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मंचावर चर्चेत आले होते.