इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावर मोठा रॉकेट हल्ला झाला होता. या स्फोटात जवळपास 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता फ्रान्स लष्कराच्या गुप्तचर अहवालावरून, या स्फोटाला संभाव्यतः पॅलेस्टाइनचे रॉकेटच जबाबदार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे रॉकेट जवळपास पाच किलोग्रॅम स्फोटके घेऊन जाताना फेल झाले. फ्रान्स लष्कराच्या एका अधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे.
गुप्तचर अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हमासच्या शस्त्रागारात असलेल्या अनेक रॉकेट्समध्ये साधारणपणे एवढ्याच वजनाची स्फोटके असतात. यांत दोन रॉकेटचा समावेश आहे. यांपैकी एक ईरान निर्मित, तर दुसरे पॅलेस्टाईन निर्मित आहे. तसेच, आपल्या कुठल्याही प्रकारच्या गुप्त माहितीने या घटनेत इस्रायलकडे इशारा केलेला नाही, असेही संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हे विश्लेषण गोपनीय माहिती, उपग्रह छायाचित्रे, इतर देशांकडून शेअर करण्यात आलेली गुप्त माहिती, तसेच ओपन-सोर्सने मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. रुग्णालय परिसरात या स्फोटामुळे एक मोठा खट्टा तयार झाला होता. याचा आकार जवळपास एक मीटर लांब, 75 सेंटीमीटर रुंद आणि 30 ते 40 सेंटीमीटर खोल असावा असा अंदाज फ्रान्सच्या लष्कराच्या गुप्त माहितीत वर्तवण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, हा खड्डा काही प्रमाणात दक्षिणेकडून उत्तरेकडे तयार झाला आहे. यावरून स्फोटक दक्षिणेकडून उत्तरेकडे तिरप्या कोणात आल्याचे समजते, असेही संबंधित अधिकाऱ्याने म्हटले होते.
तत्पूर्वी, हमासच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना जबाबदार धरले होते. मात्र, इस्रायलने हा आरोप फेटाळत, संबंधित व्हिडिओ, ऑडिओ आणि इतरही काही पुरावे सादर केले. यात, हा स्फोट पॅलेस्टाइनच्या इस्लामिक जिहादने सोडलेल्या रॉकेटमुळे झाल्याचे म्हटले होते. मात्र, इस्लामिक जिहादने या घटनेशी आपला कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.