Susie Wiles : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूझी विल्स यांची व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी याला दुजोरा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ बनणाऱ्या सूझी विल्स या पहिल्या महिला असतील. सूझी विल्स यांची नियुक्ती हा डोनाल्ड ट्रम्प यांचा जानेवारीत होणाऱ्या संभाव्य शपथविधीपूर्वीचा पहिला मोठा निर्णय आहे.
आपल्या आदेशात डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "सूझी विल्स यांनी मला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय विजय मिळविण्यात मदत केली. त्या माझ्या २०१६ आणि २०२० च्या यशस्वी अभियानाचा एक अविभाज्य घटक होत्या. सूझी विल्स या कठोर, स्मार्ट, इनोव्हेटिव्ह आहेत. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी त्या अथक परिश्रम करत राहतील. युनायटेड स्टेट्सच्या इतिहासातील पहिली महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून सूझी विल्स यांनी काम करणे हा एक योग्य सन्मान आहे."
कोण आहेत सूझी विल्स?सूझी विल्स फ्लोरिडातील अनुभवी रिपब्लिकन रणनीतीकार आहेत. सूझी विल्स यांनी २०१६ आणि २०२० मध्ये फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने चालवलेल्या अभियानाचे संपूर्ण श्रेय सूझी विल्स यांना दिले जात आहे. यापूर्वी, त्यांनी रिक स्कॉटची फ्लोरिडाच्या गव्हर्नरसाठी २०१० च्या यशस्वी मोहिमेचे व्यवस्थापन केले होते. तसेच, माजी यूटा गव्हर्नर जॉन हंट्समन यांच्या २०१२ च्या अध्यक्षीय शर्यतीसाठी काहीकाळ प्रचार व्यवस्थापक म्हणून काम केले होते.
चीफ ऑफ स्टाफचे काम काय?चीफ ऑफ स्टाफ हे अमेरिका सरकारमधील कॅबिनेट पद आहे. त्याची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतात. यासाठी सिनेटच्या मंजुरीची आवश्यकता नाही. या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती केवळ राष्ट्राध्यक्षांना रिपोर्ट करत असते. चीफ ऑफ स्टाफचे काम राष्ट्राध्यक्षांचा अजेंडा लागू करणे तसेच प्रतिस्पर्धी राजकीय आणि धोरणात्मक प्राधान्यक्रम नियंत्रित करणे हे आहे.याशिवाय राष्ट्राध्यक्षांना भेटणाऱ्या लोकांना कधी आणि कसे बोलावायचे हेही चीफ ऑफ स्टाफद्वारे ठरवले जाते.