इस्लामाबाद/लाहोर : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्रिशंकू कौल आल्यानंतर आता तीन प्रमुख राजकीय पक्षांनी रविवारी आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे समर्थन असलेल्या आणि पराभूत झालेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत न्यायालयांत धाव घेतली आहे.
माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानला सध्याच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले होते. त्यास पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांचा पाठिंबा मिळाला आहे. २६६ सदस्य असलेल्या पाक संसदेच्या २६५ पैकी २६४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
चर्चा आणि वाटाघाटीपीएमएल-एन पक्षाने आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. शेहबाज यांनी शनिवारी रात्री पीपीपीचे ज्येष्ठ नेते आसिफ अली झरदारी आणि त्यांचे पुत्र बिलावल यांची भेट घेऊन चर्चा केली. आसिफ झरदारी यांनी बिलावल यांना पंतप्रधानपदाची जागा आणि पीएमएल-एनला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात प्रमुख मंत्रिपदांची मागणी केली आहे.