नवी दिल्ली: कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असं वाटत असताना ओमायक्रॉननं धडक दिली. आतापर्यंत जवळपास ३० हून अधिक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटनं शिरकाव केला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नव्या व्हेरिएंटबद्दल एक दिलासादायक माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात वापरले गेलेले उपायच नव्या व्हेरिएंटविरुद्धच्या लढ्याचा पाया असतील, असं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही देशांनी सीमा बंद केल्या आहेत. यामुळे नव्या व्हेरिएंटविरुद्धच्या लढ्यात तयारीसाठी अधिकचा वेळ मिळेल, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. भारतासोबतच ३ डझन देशांमध्ये ऑमायक्रॉननं शिरकाव केला आहे. आफ्रिकेत रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ओमायक्रॉनबद्दल काही गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे का, त्यामुळे लोक गंभीर आजारी पडतील का, लसींमुळे निर्माण झालेली सुरक्षा तो भेदू शकतो का, अशा प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.
डब्ल्यूएचओच्या पश्चिम पॅसिफिक विभागाचे संचालक असलेल्या डॉ. ताकेशी कसई यांनी काल फिलीपीन्सहून ऑनलाईन संमेलनात सहभाग घेतला. सगळ्या देशांनी कोरोना रुग्ण संख्या वाढीला सामोरं जाण्याची तयारी ठेवायला हवी, असं कसई म्हणाले. 'आपण करत असलेले उपाय बदलण्याची गरज नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. ही बाब सकारात्मक आहे,' असं त्यांनी सांगितलं. 'आपण आतापर्यंत करत असलेले उपायच यापुढेही कायम ठेवायचे आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन, लसीकरणाला वेग देणं याच गोष्टी आपल्याला आताही करायच्या आहेत,' असं डॉ. बी ओलोवोकुरे यांनी सांगितलं. ओलोवोकुरे डब्ल्यूएचओमध्ये विभागीय आपत्कालीन स्थिती विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.