लाहोर, दि. 29 - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधु शहाबाज शरीफ यांची निवड होणार असली तरी, त्याआधी 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवणार आहेत. शाहीद अब्बासी यांची निवड अनेकांसाठी अनपेक्षित असून ते कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. शाहीद अब्बासी विद्यमान नवाझ शरीफ सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री आहेत.
शाहीद अब्बासी 1997 ते 1999 या काळात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे चेअरमन होते. 1999 साली जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानातील शरीफ यांचे सरकार उलथवून लावले. त्यावेळी अब्बासी यांना अटक करण्यात आली. ते दोनवर्ष तुरुंगात होते. 2001 साली कोर्टाने त्यांची सुटका केली.
एअर ब्ल्यु या खासगी विमान कंपनीचे ते सीईओ होते. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटीमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पदवी घेतली. 1988 पासून सहावेळा ते पाकिस्तानच्या संसदेवर निवडून गेले आहेत.
शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहीद अब्बासी पंतप्रधानपदाची जबाबदारी संभाळतील. त्यानंतर शहाबाज शरीफ पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेतील. नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पीएमएल-एन पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या. त्यात पक्षातील नेत्यांनी शहाबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली. नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडे संसदेत बहुमत असल्याने तूर्तास तरी सरकारला कुठलाही धोका नाही. नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले आहे.
नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी पंतप्रधान व्हावे, अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅशनल असेंब्लीचे ते सदस्य नसल्याने त्यांना लगेचच पंतप्रधान होता येणार नाही. त्यामुळे शाहबाझ नॅशनल असेंब्लीवर निवडून येईपर्यंत नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्याकडे सूत्रे सोपवावीत, असा विचार पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.