जिनेव्हाकोरोना व्हायरसच्या उगमाची आणि प्रसाराची कारणं शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास चीन सरकारने परवानगी नाकारली आहे. चीन सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
"आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास चीन सरकारने ऐनवेळी नकार दिल्याने आम्ही अतिशय नाराज आहोत", असं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.
चीनच्या वुहान येथे कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. यामुळे जगात धुमाकूळ घातलेल्या या व्हायरसच्या चाचणी आणि अभ्यासासाठी जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, चीनमधील अधिकाऱ्यांसाठी यासाठीच्या आवश्यक परवानग्या दिलेल्या नसल्याची माहिती टेड्रॉस घेब्रेसस यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकावरुन जागतिक पातळीवर चीनवर जोरदार टीका करण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला थेट 'चीनी व्हायरस' असं संबोधलं होतं.
"चीनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या टीमला चीनमध्ये येण्यासाठीच्या अजूनही आवश्यक परवानग्या दिल्या नसल्याचं आम्हाला कळालं आहे. चीनच्या या भूमिकेवर आम्ही अतिशय नाराज आहोत. कारण तज्ज्ञांच्या टीममधील दोन जणांनी चीनच्या प्रवासाची जवळपास संपूर्ण तयारी केली होती आणि ऐनवेळी चीनने परवानगी नाकारली आहे", असं टेड्रॉस म्हणाले.