जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंता वाढू लागली आहे. कोरोना EG.5.1 च्या या नवीन व्हेरिएंटला Eris असं नाव देण्यात आलं. ब्रिटनमध्ये थंडीची चाहूल लागताच, कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरू लागला आहे आणि लोकांच्या मनात याविषयी चिंता निर्माण झाली आहे.
याच दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनोम घेब्रेयसिस यांनी बुधवारी सांगितले, "डब्ल्यूएचओ सध्या यूएस आणि यूकेमध्ये पसरत असलेल्या EG.5.1 प्रकारासह अनेक कोरोना व्हायरस प्रकारांवर लक्ष ठेवत आहे."
WHO प्रमुख म्हणाले, "धोका कायम आहे"
टेड्रोस म्हणाले, “आणखी खतरनाक व्हेरिएंटचा उदय होण्याचा धोका कायम आहे, ज्यामुळे रूग्ण आणि मृत्यूंमध्ये अचानक वाढ होऊ शकते.” यासोबतच त्यांनी सांगितले की, एजन्सी आज यावर जोखीम रिस्क मूल्यांकन रिपोर्ट प्रकाशित करत आहे.
WHO ने बुधवारी कोविडसाठी स्थायी शिफारशींचा एक सेट देखील जारी केला, ज्यामध्ये देशांना COVID डेटा, विशेषत: मृत्यू डेटा, रुग्णांचा डेटा आणि लसीकरण देणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट एरिस, ओमायक्रॉन स्ट्रेनचा सब व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जात आहे, जो केवळ 31 जुलै 2023 रोजी ओळखला गेला होता. हा ब्रिटनमधील दुसरा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट बनला आहे, जो तेथील खराब हवामानामुळे आणि लोकांची कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे आणखी वाढला आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 14 टक्के रुग्णांना एरिस प्रकाराची लागण झाल्याचे आढळले आहे. दरम्यान, ब्रिटननंतर भारतातील मुंबई शहरात कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्याचे वृत्त आहे. डॉक्टरांच्या मते, एरिसच्या मुख्य लक्षणांमध्ये नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा (सौम्य ते गंभीर), शिंका येणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.