ओस्लो : इराणमध्ये महिलांचे हक्क, लोकशाही आणि फाशीच्या शिक्षेविरोधात वर्षानुवर्षे लढा देणाऱ्या आणि सध्या तुरुंगवासात असलेल्या कार्यकर्त्या नर्गिस मोहंमदी यांना शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
नर्गिस या नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या १९व्या महिला ठरल्या आहेत. २००३ मध्ये इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या शिरीन इबादी यांनी हा पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या दुसऱ्या इराणी महिला आहेत.
व्यवसायाने अभियंता असलेल्या मोहंमदी (५१) यांना असंख्य वेळा अटक झाली. अनेक वर्षे त्यांनी तुरुंगात घालवली. मात्र तरी आपला वसा सोडला नाही.
पुरस्कार जाहीर करणाऱ्या नॉर्वेच्या नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रीस-ॲण्डरसन म्हणाले, ‘हा पुरस्कार इराणमधील निर्विवाद नेत्या नर्गिस मोहंमदी यांना व त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण संपूर्ण चळवळीच्या कार्याला मान्यता देणारा आहे. आम्ही आशा करतो की, या चळवळीला कोणत्या का स्वरूपात होईना काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.’ (वृत्तसंस्था)
१३ वेळा तुरुंगवास मोहंमदी यांना तब्बल १३ वेळा तुरुंगात टाकण्यात आले आहे आणि पाच वेळा दोषी ठरवण्यात आले. त्यांना एकूण ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
८ वर्षांपासून नाही पती-मुलींची भेट
नर्गिस यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी आठ वर्षांपासून आपल्या मुलींना पाहिलेही नाही. एक वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या जुळ्या मुली अली आणि कियाना यांचा आवाज ऐकला होता. त्यांच्या दोन्ही मुली, पती तागी रहमानीसोबत फ्रान्समध्ये राहतात. तुरुंगात जाण्यापूर्वी त्या बंदी घातलेल्या मानवाधिकार संरक्षण केंद्राच्या उपाध्यक्ष होत्या.
जितके तुरुंगात टाकाल, तेवढे आम्ही मजबूत...
मोहंमदी यांनी तुरुंगात राहून ‘द न्यूयॉर्क टाइम्स’साठी लिखाण केले. त्यात त्यांनी ‘सरकारला हे समजत नाही की, ते आम्हाला जितके तुरुंगात टाकतील, तेवढे आम्ही अधिक मजबूत होऊ,’ असा विश्वास व्यक्त केला होता. नोबोल मिळाल्याबद्दल जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.