१ सप्टेंबर १९३९. याच दिवशी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि अख्खं जग दोन गटात विभागलं जाऊन एका मोठ्या धुमश्चक्रीला सुरुवात झाली होती. जवळपास सहा वर्षे चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूकडचे सुमारे सात ते आठ कोटी लोक मारले गेले होते. एक मोठा महाभयंकर जनसंहार या काळात जगानं अनुभवला. पण, त्याचे पडसाद आजही पाहायला आणि ऐकायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे त्या काळात विविध देशांवर टाकण्यात आलेले बॉम्ब!
१ सप्टेंबर १९३९ रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला. या हल्ल्यानं संतापलेल्या ब्रिटन आणि फ्रान्सनं पोलंडच्या बाजूनं मैदानात उडी घेतली आणि पोलंडसाठी त्यांनी यु्द्धात आपलं सैन्य उतरवलं. दुसऱ्या बाजूनं जर्मनीच्या बाजूनं इटली आणि जपान मैदानात उतरलं आणि मग हा रणसंग्राम पेटतच गेला. पोलंडच्या बाजूनं ब्रिटन आणि फ्रान्सशिवाय अमेरिका, रशिया आणि काही प्रमाणात चीननंही आपला पाठिंबा दिला. थोड्याच काळात हे युद्ध विश्वयुद्धात परावर्तित झालं आणि अख्खं जग अक्षरश: दोन गटात विभागलं गेलं. दोन्ही बाजूनं खाऊ की गिळू अशी स्थिती निर्माण झाली. वर्चस्ववादाच्या या लढाईत सर्वसामान्य जनता मात्र पार होरपळली गेली.
एकेका प्रांतावर कब्जा करू पाहणाऱ्या हिटलरला नंतर मात्र झटका बसला. आपला पराभव होतो आहे, हे लक्षात आल्यानंतर ३० एप्रिल १९४५ रोजी त्यानं आत्महत्या केली. हिटलरच्या मृत्यूनंतर एक आठवड्याच्या आतच जर्मनीनं बिनशर्त माघार घेताना सर्मपणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि ८ मे १९४५ रोजी अधिकृतपणे आपली हार मान्य केली. असं असलं तरी जपान मात्र हार मानायला तयार नव्हता. युद्धामधून जर्मनीनं माघार घेतली असली तरी जपाननं युद्ध सुरूच ठेवलं. त्यामुळे ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अण्वस्त्र हल्ला केला आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध थांबलं.
या महायु्द्धात अनेक ठिकाणी अनेक बॉम्ब फेकले गेले. लक्षावधी लोकांना त्यात मरण आलं, कोट्यवधी लोक जखमी झाले. त्यातले काही बॉम्ब फुटले, काही निष्क्रिय राहिले. त्यावेळी निष्क्रिय असलेले हे बॉम्ब नंतर पुन्हा सक्रिय होऊन अचानक फुटले आणि महायुद्ध संपल्यानंतरही पुढे कित्येक वर्षे हे बॉम्ब फुटत राहिले, लोक मरत राहिले, जखमी होत राहिले. हा सिलसिला आजही सुरू आहे. त्यावेळी न फुटलेले, निष्क्रिय असलेले हे बॉम्ब आताही अचानक फुटताहेत. अर्थात त्यातले अनेक बॉम्ब नंतर शोधलेही गेले आणि त्यानंतर ते कायमचे निष्क्रिय करण्यात आले.
जर्मनीच्या हॅम्बर्ग प्रांतात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरला गेेलेला असाच एक बॉम्ब नुकताच सापडला. या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील जवळपास पाच ते दहा हजार लोकांना तिथून सुरक्षित हटविण्यात आलं. पाेलिसांनी त्या परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारही काही काळ बंद केले. रेल्वे, रस्ते रोखण्यात आले. त्यानंतर हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात आला. त्या काळातील हा बऱ्यापैकी शक्तिशाली बॉम्ब असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. पण जर्मनी, जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे.
जपानमधील मियाजाकी एअरपोर्ट परिसरात काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्बचा अचानक स्फोट झाला होता. हा बॉम्बही अमेरिकेनंच जपानला ‘शांत’ करण्यासाठी टाकला होता. तेव्हा तो फुटला नाही, पण आत्ता झालेल्या या स्फोटानं जपानला आपली अनेक विमानं रद्द करावी लागली होती. जर्मनीतही अनेक शहरांत बऱ्याचदा असे बॉम्बस्फोट झाले आहेत. विशेषत: बांधकाम साइटवर इमारती बांधण्यासाठी खोदकाम करताना असे बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यातले काही फुटले तर काही न फुटता सापडले. याआधी २०२३मध्ये डसलडॉर्फ शहरात ५०० किलोचा बॉम्ब सापडला होता. त्यावेळी तातडीनं १५ हजार लोकांना तिथून हटवलं गेलं होतं. २०२१मध्ये म्युनिख येथे एका बाॅम्बचा अचानक स्फोट झाला होता. त्यावेळी काही लोक जखमी झाले होते.
२० लाख टनांच्या बॉम्बचा वर्षाव! दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४० ते १९४५ या दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनच्या एअरफोर्सनं युरोपवर किती टनांच्या बॉम्बचा वर्षाव केला असावा? एका अहवालानुसार युरोपवर त्यांनी एकूण २७ लाख टनांचे बॉम्ब फेकले होते. त्यातले निम्म्यापेक्षा अधिक बॉम्ब जर्मनीवर डागले गेले होते. त्यामुळेच जर्मनीत अधूनमधून अचानक बॉम्बस्फोट होत असतात. २०१७मध्ये जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे १४०० किलोचा बॉम्ब सापडला होता. त्यावेळी तब्बल एक लाख लोकांना तातडीनं आपलं घर सोडावं लागलं होतं.