नवी दिल्ली – तालिबानचीअफगाणिस्तानमध्ये वापसी ना केवळ पाकिस्तानसाठी तर चीनसाठीही एका विजयाच्या रुपाने पाहिली जात आहे. पाकिस्तानने नेहमी तालिबानचं समर्थन केले आहे. तर चीन २०१९ पासून तालिबानींचा मित्र म्हणून समोर येत आहे. २०१९ मध्ये तालिबानींच्या एका शिष्टमंडळाने अफगाणिस्तानातील चीनचे विशेष प्रतिनिधी देंग जिजुन यांच्याशी भेट करत बीजिंग दौरा केला होता. तालिबान आणि चीनने अमेरिकेसोबत शांततेवर चर्चा केली होती.
तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीन याने तेव्हा सांगितले होते की, चीनने अमेरिका-तालिबान यांच्यात अफगाण मुद्द्यावरुन शांतीपूर्ण मार्ग काढला. चीन तालिबानचं समर्थन करतो असं त्याने सांगितले होते. यावेळी मुल्ला अब्दुल गनी बरादर तालिबानी शिष्टमंडळाचा भाग होता. तालिबानच्या या दौऱ्याची चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनीही पुष्टी केली आहे. आता चीन उघडपणे तालिबानचं समर्थन करत आहेत. इतकचं नाही तर तालिबान चीनला त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करणार असल्याचं सांगितले जात आहे.
चीन का करतोय तालिबानचं समर्थन?
चीनच्या(China) घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की, चीनच्या तालिबान(Taliban) समर्थनामागे राजकीय लाभ आहे. तालिबान आणि चीन यांना एकमेकांची गरज आहे. चीन उइगर बहुल शिनजियांग क्षेत्रात हिंसाचाराने त्रस्त आहे. ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मूवमेंटचं एक कट्टरपंथी दहशतवादी संघटन जे चीन-अफगाणिस्तानच्या सीमा क्षेत्रावर ऑपरेशन चालवलं. चीनपासून वाचण्यासाठी हे दहशतवादी अफगाणिस्तानात जातात. युद्धग्रस्त भागात अद्यापही ४०० ते ७०० दहशतवादी आहेत. तालिबानने या दहशतवाद्यांना रोखण्याचं काम करावं अशी चीनची इच्छा आहे. ETIM चे दहशतवादी तालिबानला चीनला पाठवेल जेणेकरून चीन सैन्य त्यांच्यावर कारवाई करू शकेल.
...म्हणून चीनची अफगाणिस्तानवर नजर
चीन अविकसित परंतु खनिज संपत्तीनं संपन्न अशा देशांकडे मैत्रीचा हात पुढे करत आहेत. तालिबानही त्याचाच एक भाग आहे. कारण अफगाणिस्तानात बहुमुल्य खनिज संपत्ती उपलब्ध आहे. चीनचा हेतू या खजिन्यापर्यंत पोहचण्याचा आहे. अफगाणिस्तानात जवळपास १ ट्रिलियन डॉलर खनिज संपत्ती असल्याचा अंदाज आहे. चीनकडे मोठमोठ्या डोंगरातूनही खनिज शोधून टाकण्याचं तंत्रज्ञान आहे. तर तालिबानचं लक्ष्य चीनच्या माध्यमातून हा खजिना जमा करण्याचा आहे. तालिबानला त्यांचे सरकार चालवण्यासाठी पैशांची गरज आहे.
चीन-तालिबान मैत्रीनं भारताला धोका कसा?
अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याचं असणं फायदेशीर होतं कारण वॉश्गिंटन समर्थनाचं सरकार त्यावेळी शासन करत होतं. त्यामुळेच तालिबानचं समर्थन करूनही पाकिस्तानचं फारसं नुकसान झालं नाही. त्यामुळेच भारतानेही परदेशी गुंतवणूक अफगाणिस्तानात करून सॉफ्ट पावर बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेमुळे चीनचं तोंड बंद होतं. परंतु आता चीननं पुढचं पाऊल टाकलं आहे. पाकिस्ताननेही अफगाणिस्तानचा फायदा उचलण्याचा डाव रचला आहे. पाकिस्तानने भारताविरोधात डोजियर तयार केले आहे. त्यात तालिबानीविरोधी दहशतवादी संघटनांना मदत करण्याचा खोटा आरोप लावला जात आहे. पाकिस्तान तालिबानला जम्मू-काश्मीरकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. जर चीन, पाकिस्तान तालिबानला सोबत घेऊन जम्मू काश्मीरमध्ये हस्तक्षेप केला तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ISI चीफने तालिबानी नेत्यांची भेट घेतली आहे.