वॉशिंग्टन : दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे मानवरहित टेहळणी विमान ईराणने पाडले होते. यानंतर संतप्त झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी ईराणवर हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, काही मिनिटे आधी त्यांनी हा आदेश मागे घेतला. याचवेळी प्रसारमाध्यमांमध्ये ईराणच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ट्रम्पनी ठेवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, ट्रम्प यांनी ट्वीट करत त्यांनी हल्ल्याचा आदेश मागे घेण्यामागचे कारण सांगितले आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, ईराणच्या या कृत्याने हल्ला करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर शस्त्रास्त्रेही बसविण्यात आली होती. मात्र, मोठ्या संख्येने निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणार असल्याने शेवटच्या मिनिटाला आदेश मागे घेण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करण्यात येणार होता. मात्र, जेव्हा वरिष्ठ आधिकाऱ्यांना विचारले की, किती लोकांचा मृत्यू होईल तेव्हा त्यांनी सर, 150 असे उत्तर दिले. यामुळे हल्ला थांबविला, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.
अमेरिकेचे सैन्य आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. 10 मिनिट आधीच हा हल्ला थांबविला. ईराणवर कडक प्रतिबंद लावण्यात आले आहेत. ते कधीच अण्वस्त्र बनवू शकणार नाहीत. अमेरिकाच सोडा तर जगातील कोणत्याही देशाविरोधात ते अण्वस्त्र वापरू शकणार नाहीत.
ट्रम्प यांनी ओबामांवरही टीका केली आहे. ओबामा राष्ट्रपती असताना त्यांनी ईराणसोबत धोकादायक व्यवहार केला होता. यामध्ये त्यांना 150 अब्ज डॉलर एवढी रक्कम रोख देण्यात आली. ईराण तेव्हा मोठ्या संकटात होता आणि या पैशांचा वापर करून ईराणने परिस्थिती सुधारली. तसेच आण्विक शस्त्रे बनविण्याचा मार्गही खुला केला. मात्र, मी ही डील रद्द केली. अमेरिकन काँगेसनेही मंजुरी दिली नव्हती आणि ईराणवर कडक प्रतिबंध लादले. आज तो देश पहिल्यापेक्षा कमकुवत आहे.