Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:40 AM2022-02-25T11:40:05+5:302022-02-25T11:41:56+5:30

युक्रेन हा युरोपमधील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या आधारे रशियानंतर युरोपमधील हा दुसरा महत्त्वाचा आणि मोठा देश आहे.

Why do Indian students go to Ukraine Find out what is capital currency population russia ukraine conflict | Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्व जगाचे लक्ष सध्या युक्रेन आणि रशिया या देशांवर केंद्रित झाले आहे. युक्रेन हा युरोपमधील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या आधारे रशियानंतर युरोपमधील हा दुसरा महत्त्वाचा आणि मोठा देश आहे. युक्रेनच्या सीमा उत्तर बेलारुस, पश्चिम पोलँड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी व दक्षिण रोमानिया, मोल्दोवा यांना लागून आहेत. 
युक्रेनचे क्षेत्रफळ ६,०७,७०० वर्ग किमी आहे. या देशातील सर्वांत मोठे शहर आहे राजधानी कीव. येथील चलन आहे युक्रेनियन रिव्निया. याची किंमत भारतीय रुपयात २.६१, तर ०.०३५ अमेरिकन डॉलरच्या बरोबर आहे. युक्रेनची अधिकृत भाषा आहे युक्रेनी. ही भाषा सिरिलिक वर्णमालेच्या स्वरूपात लिहिली जाते. युक्रेनमध्ये रशियन भाषाही बोलली जाते; पण अधिकृत भाषा आहे युक्रेनी. त्या प्रमाणात येथे इंग्रजी कमी प्रमाणात बोलली वा लिहिली जाते. युक्रेनची एकूण लोकसंख्या सव्वाचार कोटींवर आहे.

भारताची भूमिका असमाधानकारक : युक्रेन 
रशियाने केलेल्या आक्रमणाबाबत भारताने घेतलेली भूमिका समाधानकारक नाही, अशा शब्दांत युक्रेनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्या देशाचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी सांगितले की, भारताचे रशियाशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे युक्रेनमधून रशियन सैन्य माघारी जाण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पुतिन ज्या थोड्या नेत्यांचे ऐकतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. त्यामुळे भारताने युक्रेनला वाचविण्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे भावनिक आवाहनही पोलिखा यांनी केले. युक्रेनच्या प्रश्नात सर्वांनीच संयम बाळगावा, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील बैठकीत केले होते. त्या भूमिकेची रशियाने प्रशंसा केली होती. या घडामोडींमुळे युक्रेन भारतावर नाराज आहे.

युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाबरोबर राजनैतिक संबंध संपुष्टात आल्याची घोषणा केली असून, देशात मार्शल लॉ लागू केला. तेथील नागरिक रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. युक्रेनमध्ये भारतासह अनेक देशांतले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युद्धामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी परत जाण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रशियाचे भूराजकीय महत्त्वामुळे आक्रमण
युरोप ऊर्जेच्या बाबतीत रशियावर अवलंबून आहे. भविष्यात युक्रेनने हे मार्ग बंद केल्यास रशियावर याचे परिणाम होऊ शकतात. या सोबतच युक्रेन हा नाटो देशांचे सदस्य होण्यास इच्छुक आहे. जगाचा विचार केल्यास या परिस्थितीत जर्मनी आणि फ्रान्स काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते रशियाच्या पूर्ण विरोधात जातील असे वाटत नाही. हा काळ भारतीय परराष्ट्र धोरणासाठी परीक्षेचा काळ राहणार आहे. अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांचा भारतावर रशियाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेण्याबाबत दबाव आहे. मात्र, अद्यापतरी भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. युद्धाच्या परिणामाबाबत बोलल्यास याचे आर्थिक परिणाम जगावर दिसतील. आताच सोने आणि पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. यासारखे आणखी दूरगामी परिणाम येत्या काळात दिसतील. हे युद्ध रशिया आणि युक्रेन यांच्यापुरतेच मर्यादित आहे. अमेरिकेनेही युक्रेनमधून काढता पाय घेतला आहे. यामुळे हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल असे वाटत नाही.
राजेंद्र निंभोरकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल


युक्रेन युद्धाचे जगावर दूरगामी परिणाम होतील
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे परिणाम जगावर होणार आहेत. भारतालाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी पंतप्रधान मोदी व भारतीय जनतेने युक्रेनला मदतीचे आवाहन केले आहे. रशियाशी चर्चा करून युद्ध थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते; पण रशियाने दबावाखाली न येता युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे बड्या राष्ट्रांना पुढे यावे लागणार आहे. रशिया या युद्धात युक्रेनला नमवण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा आणि शस्त्रास्त्रांचा वापर करू शकतो. या युद्धामुळे तिसऱ्या युद्धाची नांदी होईल का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. युद्धाचे स्वरूप पाहता तसेच पाश्चिमात्य देशांची भूमिका पाहता, हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल, असे वाटत नाही.
दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल


युक्रेन युद्धामुळे भारतीय कूटनीतीपुढे आव्हाने
अलिप्ततेचे धोरण आता भारताला स्वीकारता येणार नाही. देशातील अंतर्गत प्रश्न पाहता, विशेषत: तेल, नॅचरल रिसोर्सेस आणि परराष्ट्र धाेरण याची सांगड घालून योग्य ते निर्णय घ्यावे लागणार आहेत. काही राज्यातील निवडणुकांनंतर तेल किंमती १५० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. असे झाले तरी देशाची तेलाची आणि ऊर्जेची गरज जास्त आहे. विशेषत: चीनला तोंड देण्यासाठी भारताला रशियाची गरज आहे. भूराजकीय परिस्थिती, आर्थिक स्थिती आणि देशांच्या गरजा ओळखून परराष्ट्र धोरण ठरवावे लागणार आहे. हे करताना भारताचा कस लागेल. युरोपीय देशांकडेही रशियाला काऊंटर करण्यासाठी योग्य साधने नाहीत. हे युद्ध काही काळातच थांबू शकते.
- डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ


युक्रेनमधील एमबीबीएसला आहे भारतात मान्यता 
युक्रेनमध्ये प्राप्त केलेल्या एमबीबीएसच्या पदवीला भारतात मान्यता आहे. येथे एमबीबीएसचे शिक्षण भारतातील खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी मेडिकलच्या शिक्षणासाठी युक्रेनला जातात. 

प्रवेशासाठी या आहेत अटी आणि नियम 
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. यासाठी पीसीबी विषयासह १२वीत ५० टक्के गुणाने उत्तीर्ण आणि नीट स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. या कोर्सची फी ३५०० ते ५००० अमेरिकन डॉलर आहे. शिक्षणाचे माध्यम आहे इंग्रजी, प्रवेश परीक्षा नीटी यूजी. 

Web Title: Why do Indian students go to Ukraine Find out what is capital currency population russia ukraine conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.