स्टॉकहोम : कामगार विश्वामध्ये महिलांची नेमकी भूमिका तसेच त्यांचा वाटा किती आहे, याबाबत सखोल संशोधन करणाऱ्या अर्थतज्ज्ञ व हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक क्लॉडिया गोल्डिन यांना यंदाच्या वर्षीचा अर्थशास्त्रासाठीचा ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
गोल्डिन या अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत, असे रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सचिव हॅन्स एलेग्रेन यांनी सांगितले. अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराकरिता विजेता निवडण्याच्या समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन म्हणाले की, कामगार विश्वामध्ये महिलांचा किती सहभाग आहे हे समजणे अतिशय आवश्यक असते. महिलांचा कामगार विश्वामध्ये सहभाग वाढविण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा अभ्यास क्लॉडिया गोल्डिन यांनी केला आहे. त्यामुळे श्रमविश्वातील पुरुष व महिलांचे प्रमाण किती व श्रमविभागणीबद्दलच्या आणखी काही गोष्टी यांच्यावर त्यांनी संशोधन केले.
महिलांचा सहभाग कमी का? यावर केला हाेता अभ्यास- महिलांचा श्रमविश्वात सहभाग वाढविण्यामध्ये नेमके काय अडथळे आहेत, हेही गोल्डिन यांच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. - नोबेल पुरस्कार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, श्रमविश्वामध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी नेमके काय उपाय योजावेत, हे क्लॉडिया गोल्डिन आपल्या संशोधनातून सांगत नाहीत. - त्या विश्वात श्रमिक पुरुष व महिलांच्या संख्येत इतकी मोठी तफावत कशामुळे निर्माण झाली, याची मूळ कारणे गोल्डिन यांनी शोधली आहेत.