वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी भारताने तिथे आपली फौज का धाडली नाही, असा अजब सवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तेथील ग्रंथालयाला मोदी सरकारने दिलेल्या निधीचा त्या देशाला काहीही उपयोग नाही, अशीही टीका त्यांनी केली. त्याला उत्तर देताना भारताने म्हटले आहे की, विकासकामांसाठी केलेली मदत अफगाणिस्तानमध्ये मोठे बदल घडवू शकते.नव्या वर्षात आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ते बोलत होते.अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी तिथे रशिया, पाकिस्तान, भारत यापैकी कोणाचेही लष्कर धावून गेलेले दिसत नाही. तिथेफक्त अमेरिकेचे लष्कर तैनातआहे.अफगाणिस्तान आमच्या देशापासून ६ हजार मैल इतक्या दूर अंतरावर आहे. दक्षिण आशियासंदर्भात धोरण ठरविणाऱ्यांनी अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानात पाठवून चुकीचा निर्णय घेतलाआहे.भारत अमेरिकेबरोबरच्या व्यापारात अब्जावधी डॉलर कमावतो. तरीही अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिकेने मदत करावी, अशी भारताची अपेक्षा असते. अफगाणिस्तानच्या विकासात भारत बजावत असलेली भूमिका चांगली असली तरी त्यांचे लष्कर तेथे का नाही हा प्रश्न कायमच आहे.आम्ही स्वत:हून फौज पाठवत नाही -भारतट्र्म्पच्या टीकेला उत्तर देताना भारताने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी भारत सर्व प्रकारची मदत करत आहे. त्यातून त्या देशात परिवर्तन होण्यास मदत मिळेल. अफगाणिस्तानमध्ये छोटी छोटी ग्रंथालये बांधण्याचे काम भारताने हाती घेतले आहे. त्या शिवाय तिथे झारांज ते देलराम हा २१८ किमीचा रस्ता भारतातर्फे बांधून देण्यात येत आहे.त्या देशातील जवानांना लष्करी प्रशिक्षण देणे तसेच संरक्षण सामुग्री पुरविणे आदी मदतही केली जाते. कोणत्याही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून फौज पाठविली जाते. आम्ही स्वत:हून कुठेही फौज पाठवत नाही, असा टोला भारताने ट्रम्पना लगावला.
अफगाणमध्ये भारताने फौज का धाडली नाही? ट्रम्प यांचा अजब सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:05 AM