सध्या जपानमधील वृद्धांची वाढती संख्या आणि ग्रामीण भागातील महिलांची घटती संख्या, हा सरकारसाठी चिंतेचे विषय बनला आहे. याचा सामना करण्यासाठी जपानसरकारने अविवाहित महिलांना लग्न केल्यास, एक मोठी रक्कम देण्याची योजना आखली आहे. मात्र, यासाठी महिलांना टोकियो सोडून ग्रामीण भागात लग्न करावे लागणार आहे.
जपानमधील ग्रामीण भागात अविवाहित महिलांची संख्या अविवाहित पुरुषांच्या तुलनेत बरीच कमी आहे. 2020 च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, टोकियो वगळता जपानच्या 47 प्रांतांपैकी 46 प्रांतातं 15 ते 49 वयोगटातील सुमारे 91 लाख महिला होत्या. हा आकडा याच वयोगटातील 1.11 कोटी अविवाहित पुरुषांच्या तुलनेत सुमारे 20 टक्के कमी आहे. काही भागात हे अंतर 30 टक्क्यांवर पोहोचले आहे.
लग्न करून गेल्यास मिळेल मोठी रक्कम - गेल्या काही वर्षांत, पुरुषांच्या तुलनेत अधिक महिला ग्रेटर टोकियोमध्ये गेल्या आहेत. या महिला शिक्षणासाठी गेल्यानंतर पुन्हा ग्रामीण भागात परतत नाहीत. यामुळे जपानच्या ग्रामीण भागात लिंग गुणोत्तर ढासळत चालले आहे. जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, नव्या उपक्रमांतर्गत आता सध्याचे अनुदान वाढवण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत जाणाऱ्या महिलांना सरकार 7000 डॉलरपर्यंत रक्कम देणार आहे.
कमी होणारी लोकसंख्या -सध्या जपान घटत्या लोकसंख्येचाही सामना करत आहे. जपानचा जन्म दर आतापर्यंतचा सर्वात खालच्या पातळीवर आहे. गेल्यावर्षी येथे केवळ 727,277 जन्म नोंदवले गेले आणि प्रजनन दर 1.20 होता. एखादा देश अथवा एखाद्या भागातील लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जन्मदर 2.1 असणे आवश्यक आहे. अर्थात प्रत्येक जोडप्याने 2.1 मुलं जन्माला घालणे आवश्यक आहे.
सरकारनं सुरू केलं डेटिंग ॲप -जपान सरकारने काही वर्षांत घटत्या लोकसंख्येचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात मुलांना जन्म देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन, विस्तारित बालसंगोपन सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय सरकारने एक डेटिंग ॲपही लाँच केले आहे. ज्याचा वापर अविवाहितांची भेट घडवून आणण्यासाठी होतो. टोकियोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती लग्नासाठी इच्छूक असेल, पण तिला जोडीदार सापडत नसेल, तर आम्ही त्यांना मदत करतो. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी घटत्या जन्मदराला 'देशातील सर्वात गंभीर संकट' म्हटले आहे.