ह्युस्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होतील. सुमारे ५० हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दरम्यान, हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काही विशेष कारणांमुळे ह्युस्टन या शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उपस्थिती लावण्यामागेही एक महत्त्वपूर्ण कारण आहे.
हाऊडी मोदी हा कार्यक्रम ह्युस्टन येथे आयोजित होण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या शहरात मोठ्या प्रमाणावर असलेले भारतीय वंशांचा नागरिकांचे प्रमाण होय. टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. ह्युस्टनप्रमाणेच डल्लास या शहरामध्येही भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ही दोन्ही शहरे अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत यापूर्वीही अशा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
हाऊडी मोदी या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती ही हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्यामुळे हाऊडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहून या भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांनी ट्रम्प यांच्याऐवजी हिलेरी क्लिंटन यांना मतदान केले होते. ही बाब नॅशनल एशियन अमेरिकन सर्वेमधून समोर आली होती. त्यामुळे आज मोदींसोबत एकत्र कार्यक्रम करून इंडो-अमेरिकन नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल झाले असून आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींनी तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली आहे. ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील 320 आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.