नवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली. यादरम्यान, डोवाल यांनी पुतीन यांच्यासोबत विविध द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. रशियातीलभारतीय दूतावासाने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. 'NSA डोवाल यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. या भेटीत विविध द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठी काम करत राहण्याचे मान्य करण्यात आले. डोवाल बुधवारी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. यापूर्वी डोवाल भारतीय अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह अमेरिकेला गेले होते. यादरम्यान आधुनिक तंत्रज्ञानावर अमेरिकेसोबत एकत्र काम करण्याचे मान्य करण्यात आले.
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! IMF सोबतच्या चर्चा अडकल्या, महागाई पुन्हा वाढणार
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानवरील सुरक्षा संवादात भाग घेतला, यात बदलत्या प्रादेशिक सुरक्षा मापदंडांवरही चर्चा झाली. डोवाल यांनी बुधवारी रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात केली. यजमान देश आणि भारताव्यतिरिक्त इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानमधील उच्च सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तानवरील सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या पाचव्या बहुपक्षीय बैठकीत सहभागी झाले होते. अफगाणिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती आणि त्यासमोरील मानवतावादी आव्हानांसह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या संवादाचा तिसरा टप्पा नोव्हेंबर २०२१ मध्ये डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडला. डोवाल म्हणाले की, अफगाणिस्तान कठीण टप्प्यातून जात आहे आणि भारताचे अफगाणिस्तानशी ऐतिहासिक आणि विशेष संबंध आहेत. अफगाणिस्तानातील लोकांचे कल्याण आणि मानवतावादी गरजा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असून नवी दिल्ली अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी कधीही एकटे सोडणार नाही, असंही ते म्हणाले.