Israel Attack Syria : सीरियातील सामरिक लष्करी ठिकाणांवर गेल्या 48 तासांत 400 हून अधिक हल्ले केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. सीरियातील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांना देश सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला. इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांनी सीरियाची जवळपास 70 ते 80 टक्के सामरिक लष्करी मालमत्ता नष्ट केली आहे.
गेल्या 48 तासात इस्रायल संरक्षण दलाने (IDF) सीरियातील बहुसंख्य धोरणात्मक शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर हल्ला केला, ज्यामुळे ते दहशतवादी घटकांच्या हातात जाण्यापासून रोखले गेले, असे इस्रायलच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, 80 ते 190 किलोमीटरच्या पल्ल्याची डझनभर क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेपणास्त्रात मोठ्या प्रमाणात स्फोटके होते, ज्यामुळे या भागातील नागरी आणि लष्करी जहाजांना धोका निर्माण झाला होता, असेही इस्रायलने म्हटले आहे.
याचबरोबर, स्कड क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, जमिनीपासून समुद्रात मारा करणारी, जमिनीपासून हवेत आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, यूएव्ही, लढाऊ विमाने, अटॅक हेलिकॉप्टर, रडार, टँक, हँगर आणि अनेक सामरिक मालमत्ता निष्प्रभ करण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले. दरम्यान, तसे पाहिले तर २०११ मध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियामध्ये शेकडो हल्ले केले आहेत.
नेतान्याहू काय म्हणाले?इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, बशर अल-असद यांचा पतन हा मध्य पूर्वेतील ऐतिहासिक दिवस होता. तसेच, या घटना म्हणजे असद यांच्या मुख्य समर्थक इराण आणि हिजबुल्लाह संघटनेवर आमच्याकडून झालेल्या हल्ल्यांचा थेट परिणाम आहे.