Elon Musk on Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. फ्लोरिडा येथील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवारी गोळीबारी झाल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रम्प यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर उद्योगपती एलन मस्क यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. कमला हॅरिस आणि जो बायडेन यांच्या हत्येचा एकही प्रयत्न कोणी करत नाही, अशी खळबळजनक पोस्ट मस्क यांनी केली आहे. मस्क यांच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली असून अनेकजण त्याबाबत भाष्य करत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसऱ्यांदा हत्येचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली आहे. आरोपी युक्रेन समर्थक असून डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देत असल्याचे वृत्त आहे. या सगळ्या प्रकारानंतर, अब्जाधीश एलन मस्क यांनी त्यांच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. केवळ ट्रम्प यांच्यावरच प्राणघातक हल्ले का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. जो बाडेन किंवा कमला हॅरिस यांच्यावर जीवघेणे हल्ले का होत नाही? अशी पोस्ट मस्क यांनी एक्सवर केली.
एलन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर "त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना का मारायचे आहे?" असा सवाल केला होता. त्यावर उत्तर देताना मस्क यांनी हे धक्कादायक विधान केलं. "आणि कोणीही बिडेन किंवा कमला हॅरिसची हत्या करण्याचा प्रयत्न करत नाही," असं प्रत्युत्तर मस्क यांनी दिलं. जुलैमध्ये मस्क यांनी आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता केलेल्या विधानानं खळबळ उडाली आहे.
काही नेटकऱ्यांनी मस्क यांच्यावर निशाणा साधला.तुमचं काय बिघडवलं आहे, काहीही पोस्ट करण्यापूर्वी विचार करता का? असा सवाल एका नेटकऱ्याने केला. दुसऱ्या एका युजरने, कोणीही कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नाही, असं म्हटलं. आणखी एका युजरने बायडेन यांच्या काळात ट्रम्प यांच्याविरोधात अनेक घटना घडल्या आहेत, त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही, असा सवाल केला.