२१ वर्षीय युवकाला का घाबरली बलाढ्य अमेरिका?; म्हणते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 08:21 AM2023-05-09T08:21:32+5:302023-05-09T08:22:43+5:30
जॅकला मागील महिन्यात फेडरल कोर्टासमोर हजर केले होते. ज्याठिकाणी प्रॉसिक्यूटर्सने त्याला जेलमध्ये राहण्यास सांगितले.
अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालय पेंटागनमधून लीक झालेल्या टॉप सीक्रेट फाईल्स प्रकरण आता आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. गुप्त दस्तावेज लीक केल्याच्या आरोपाखाली २१ वर्षीय जॅक टेक्सेरा(Jack Teixeria) याला एफबीआयने मागील महिन्यात अटक केली होती. या मुलाची सुटका करणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते असा इशारा अमेरिकेच्या कायदे विभागाने दिला आहे.
जॅकला मागील महिन्यात फेडरल कोर्टासमोर हजर केले होते. ज्याठिकाणी प्रॉसिक्यूटर्सने त्याला जेलमध्ये राहण्यास सांगितले. कायदे विभागाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात या २१ वर्षीय जॅकला त्याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय जेलमधून सुटका करू नये यासाठी कारणे दिली होती. पेंटागनच्या या लीक झालेल्या दस्तावेजांमुळे अमेरिकेचे अनेक सहकारी देश नाराज आहेत. ही ती कागदपत्रे आहेत ज्यात यूक्रेन युद्धाबाबत अनेक महत्त्वपूर्ण माहिती आहे. ज्यामुळे आता ज्यो बायडन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जॅकने गेमिंग ग्रुपमध्ये ही गुप्त कागदपत्रे शेअर केली होती.
जॅक टेक्सेरा कोण आहे?
जॅक मॅसॅच्युसेट्समध्ये एअर नॅशनल गार्ड्समन म्हणून तैनात होता. तो २०१९ मध्ये एअर नॅशनल गार्डमध्ये रुजू झाला आणि तिथे आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम करत होता. अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिस्कॉर्डच्या चॅटरूममध्ये जॅकने गेमर्सचे अनेक गुप्त दस्तावेज शेअर केले होते. त्याच्या ग्रुपचे नाव होते 'ठग शेकर सेंट्रल'.
लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये काय आहे?
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात केवळ युक्रेनचे सैन्य युक्रेनच्या बाजूने लढत नाहीत असं लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये उघड झाले आहे. युक्रेनमध्ये सध्या १४ अमेरिकन आणि ५० ब्रिटीश सैन्य आहेत, जे थेट रशियाशी मुकाबला करत असल्याचे कागदपत्रांमध्ये उघड झाले आहे. दुसर्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, नाटो सदस्य देश अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि लॅटव्हियाचे १०० विशेष अधिकारी आधीच युक्रेनमध्ये उपस्थित होते. २०२१ मध्ये, ब्रिटनच्या विशेष दलांनी युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण दिले. परंतु ब्रिटीश सरकारने युक्रेनमध्ये आपल्या विशेष सैन्याची उपस्थिती कधीच मान्य केली नाही.
या कागदपत्रांमध्ये पाश्चात्य देशांचे विशेष सैन्य युक्रेनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ब्रिटीश स्पेशल फोर्सेसची टीम सर्वात मोठी असून ब्रिटनची ५०, लॅटव्हियाची १७, फ्रान्सची १५, अमेरिकेची १४ आणि नेदरलँडची एक टीम युक्रेनमध्ये आहे. याहून अधिक धक्कादायक माहिती या दस्तावेजांमध्ये आहे. त्यामुळे हे बाहेर आल्यावर अमेरिकेसह विविध देशांच्या सुरक्षेलाही धोका आहे असं सांगण्यात आले आहे.