वॉशिंग्टन- दक्षिण अमेरिका खंडातील अमेरिकेचा जुना वैरी व्हेनेझुएलावर आपण आक्रमण का करु नये असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांना विचारला होता. याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली असून अमेरिकेच्या युद्धखोर स्वभावावर जगभरातून टीका होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नवजा सूचनेमुळे बैठकीतील सर्वच अधिकारी अवाक झाले होते. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांचाही या बैठकीत समावेश होता. व्हेनेझुएलाचा सगळा डोलारा ह्युगो चावेज यांच्यानंतर एकाधिकारशहा बनलेल्या निकोलस मडुरो यांच्यावर आहे. निकोलस मडुरो यांना शिक्षा करण्याच्या नादात अमेरिकेने लष्करी कारवाईचे पाऊल उचलले तर हे सगळे आपल्यावर उलटू शकते. त्याचप्रमाणे लॅटीन अमेरिकेतील इतर देशांमधील सरकारे आपल्यावर नाराज होतील असे मॅकमास्टर यांनी ट्रम्प यांना समजावले. एका अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती उघड केली आहे. इतके समजावल्यावरही ट्रम्प यांचे समाधान झाले नाही. यापुर्वी पनामा आणि ग्रेनाडावर कारवाई केल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं.