ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 12 - दहशतवादाच्या मुद्द्यावर जगात वेगळा पडलेल्या पाकिस्तानला आता पाकिस्तानमधल्या मीडियानेच घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असलेल्या पाकिस्तान डेली या वृत्तपत्रानेच पाकिस्तान लष्कर प्रमुख राहील शरीफ आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मझूदला अटक का करत नाही, असा प्रश्न विचारला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका पोहोचवणा-या या दोघांवर पाकिस्तान कारवाई करावी, अशी मागणीही या पाकिस्तान डेली या वृत्तपत्राने केली आहे.
पाकिस्तान डेली या वृत्तपत्रानं लिहिलेल्या संपादकीयमधून पाकिस्तानवरच हल्लाबोल करण्यात आला आहे. पाकिस्तान कशा प्रकारे मित्र राष्ट्रांपासून दुरावत चालला आहे, याचं सखोल विश्लेषण या लेखात करण्यात आलं आहे. तसेच सईद आणि मझूदला अटक करण्याऐवजी पाकिस्तान पत्रकारांना देशाबाहेर जाण्यास बंदी घालत आहे. जे पत्रकार सातत्यानं दहशतवादी आणि लष्कराच्या लागेबांधे याबाबत लिहीत असतात.
तसेच पठाणकोट हल्ल्यातला मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा नेता मझूद आणि लष्कर ए तोयबाचा हाफिज पाकिस्तानच्या रस्त्यावर खुलेआम फिरत असल्याबाबतही या लेखातून टिपण्णी करण्यात आली आहे. पाकिस्तानचं लष्करच या दहशतवाद्यांचं रक्षण करत असल्याचंही या लेखात म्हटलं आहे. सरकार आणि लष्कर आम्हाला कसे काम करावे हे शिकवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्यांनी आधी या दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि मग आम्हाला शिकवावे, असंही त्यात लिहिलं आहे.