भारताचा शेजारी देश श्रीलंका १९४८ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हापासून पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक यश संपादन करणारा हा देश सध्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic Crisis) जात आहे. अशा स्थितीत देशाचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे 'आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही, मग आर्थिक सुधारणा काय करणार?’ हे विधान लोकांना सतावत आहे. पाहूया अखेर विक्रमसिंघे यांनी कोणत्या कारणासाठी हे विधान केले.
देशात आर्थिक सुधारणांना (सध्या) काही अर्थ नाही. रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची अर्थव्यवस्थाच नाहीये, तर आर्थिक सुधारणा काय करणार, असे विक्रमसिंघे म्हणाले. (No point in economic reforms when we don’t have an economy) परकीय चलनाच्या साठ्यातील प्रचंड तुटवड्यामुळे श्रीलंका आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. या वर्षी एप्रिलच्या मध्यात श्रीलंकेने परकीय चलनाच्या संकटामुळे स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते.
का म्हणाले राष्ट्राध्यक्ष असं?डेली लंका मिररच्या बातमीचा हवाला देत एजन्सीने सांगितले की, रानिल विक्रमसिंघे सोमवारी श्रीलंका इकॉनॉमिक समिट 2022 ला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, संकटात सापडलेली देशाची अर्थव्यवस्था कालबाह्य आर्थिक धोरणे आणि यंत्रणांनी दुरुस्त केली जाऊ शकत नाही. यावेळी त्यांनी देशात नवे आर्थिक मॉडेल (New Economic Model) तयार करण्याबाबतही वक्तव्य केलं.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आमची कोणतीही योजना नाही. आपल्याकडे अर्थव्यवस्थाच नसताना आपण अर्थव्यवस्था कशी सुधारणार? आम्हाला नवी अर्थव्यवस्था उभारायची आहे, असे त्यांनी नमूद केले. आपले व्यापार संतुलन आपल्या बाजूने नाही. तर आपण पुन्हा तीच रचना उभी करणार आहोत आणि मग त्याच वेगाने खाली येण्याचा विचार करणार आहोत का? असेही ते म्हणाले.
श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 2.9 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे. सप्टेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी श्रीलंकेला आपल्या कर्जाची पुनर्रचना करावी लागेल. आम्ही आमच्या द्विपक्षीय कर्जदारांशी चर्चा करत आहोत. भारतासोबतची आमची चर्चाही यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर चीनशीही आमची चर्चा सुरू आहे. भारताच्या अदानी समूहासोबत (Adani Group in Sri Lanka) कोलंबो हार्बरचे पश्चिम टर्मिनल विकसित करणे हा यातील महत्त्वाचा दुवा असल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले.