अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या स्पष्ट आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखळे जातात. ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरे तर, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सोडण्यात आलेले 7 अब्ज डॉलरची अमेरिकन लष्कराची उपकरणे परत करण्याची मागणी केली आहे. मात्र तालिबानने त्यांची ही मागणी धुडकावून लावली आहे. तसेच, ती शस्त्रास्त्रे आता अफगाणिस्तानची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एका रॅलीदरम्यान अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी उपकरणे परत करण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्यांचे हे विधान तालिबानने स्पष्ट शब्दात फेटालून अथवा धुडकावून लावले आहे. यासंदर्भात बोलताना तालिबानचे प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाले, "ही शस्त्रास्त्रे अमेरिकेने स्वेच्छेने सोडली होती आणि आता ती अफगाणिस्तानची संपत्ती आहेत. जर ही शस्त्रे कुणी घेण्याचा प्रयत्न केला, तर तालिबान त्याला शस्त्रांनेच प्रत्युत्तर देईल."
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने अफगाणिस्तानात सोडलेल्या आधुनिक उपकरणांमुळे तालिबानची ताकद अनेक पटिंनी वाढली आहे. या उपकरणांमध्ये, लष्करी वाहने, ड्रोन, मोठ्या प्रमाणात बंदुका आदींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, काही तज्ज्ञांच्या मते, या शस्त्रांमुळे अफगाणिस्तानात तालिबानची स्थिती आणखी मजबूत होईल. याशिवाय, तालिबान या उपकरणांचा वापर त्यांच्या शेजारील देशांवर दबाव टाकण्यासाठी आणि इतर कट्टरपंथी संघटनांना पाठिंबा देण्यासाठीही करू शकतो.
ट्रम्प यांच्या धमकीचा काय परिणाम होईल? -खरे तर, ट्रम्प यांच्या या मागणीमुळे फार तर त्यांचे समर्थक आकर्षित होऊ शकतील. मात्र, वास्तविकता अशी आहे की, आता तालिबानचे अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण आहे. यामुळे अमेरिकेला ही शस्त्रे परत मिळणे जवळपास अशक्यच आहे.