मॉस्को: रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करून आठवडा होत आला आहे. मात्र रशियानं युद्धात अद्याप हवाई दलाचा वापर केलेला नाही. युक्रेनच्या तुलनेत रशियाचं हवाई दल कैकपट शक्तिशाली आहे. मात्र युक्रेनचं हवाई दल संपूर्ण शक्तीनं युद्धात उतरलेलं असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हवाई दलाचा वापर सुरू केलेला नाही. याबद्दल जगात आश्चर्य व्यक्त होत आहे.
रशिया आपल्या हवाई दलाच्या माध्यमातून युक्रेनवर हल्ला करेल, असं दावा अमेरिकेनं युद्धाआधी केला होता. मात्र गेल्या सहा दिवसांत पुतीन यांनी आपल्या लष्करावर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. यामुळे अमेरिकन अधिकारी चक्रावले आहेत. जगातील सर्वोत्तम हवाई दलांमध्ये रशियाचा नंबर दुसरा लागतो. रशियाकडे एकूण ४१७३ विमानं आहेत. यात ७७२ लढाऊ, ७३९ अटॅक, ४४५ वाहतूक, ५५४ प्रशिक्षण, १३२ स्पेशल मिशन, २० टँकर, १५४३ हेलिकॉप्टर आणि ५४४ अटॅक हेलिकॉप्टरचा समावेश होतो.
रशिया जोखीम घेऊ इच्छित नसल्यानं त्यांच्याकडून हवाई दलाचा वापर होत नसावा, असं अमेरिकेच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर अल जझीराला सांगितलं. आपल्या विमानांना आणि नागरिकांना युद्धात थेट उतरवण्याची रशियाची तयारी नसल्याचं दिसत आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनी हवाई दलाची ताकद कमी आहे. मात्र तरीही त्यांचं हवाई दल सातत्यानं रशियन सैन्यावर हल्ले करत आहे.
युद्ध सुरू होताच रशियन हवाई दल ताकदीनिशी उतरेल आणि युक्रेनी हवाई दल, एअर डिफेन्सला उद्ध्वस्त करेल, असा युद्ध रणनीतीकारांचा अंदाज चुकला. मात्र रशियाचं हवाई दल युद्धात उतरलेलं नाही. त्याउलट युक्रेनचं हवाई दल अमेरिकेकडून मिळालेल्या रणगाडेविरोधी शस्त्रास्त्रं आणि तुर्कस्तानकडून मिळालेल्या ड्रोनचा प्रभावी वापर करत आहे.