इस्लामाबाद: पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आज(दि.25) त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली. 40 मिनिटांच्या या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी लगेचच व्यावसायिक विमानाने भारताकडे रवाना झाले.भेटीसाठी खास काचेची रूम -पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. काचेच्या एका बाजूला कुलभूषण जाधव बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. ते एकमेकांना दिसत होते पण काही अंतरावर असूनही त्यांना एकमेकांना मायेचा स्पर्श करता आला नाही. त्यामुळे थेट संवाद न होता इंटरकॉमच्या माध्यमातूनच त्यांच्यात बोलणं झालं.तब्बल दीड वर्षानंतर झालेल्या या भेटीदरम्यान काचेची भिंत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून पाकिस्तानवर टीका होत आहे. का होती काचेची भिंत -या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या भेटी दरम्यान काचेची भिंत का होती असा प्रश्न पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांना विचारण्यात आला. त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काचेची भिंत ठेवण्यात आली होती असं ते म्हणाले. कुलभूषण जाधवची भेट घेता येईल पण भेटीदरम्यान सुरक्षेची काळजी घेतली जाईल असं आम्ही भारताला यापूर्वीच कळवलं होतं असं स्पष्टीकरण मोहम्मद फैसल यांनी दिलं आहे.
या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. आई आणि पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकडे केली होती. माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो असं या व्हिडीओत कुलभूषण जाधव म्हणताना दिसत आहेत. सीएनएन न्यूज 18 ने कुलभूषण जाधव यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दहा मिनीटं भेट वाढवली -
30 मिनिटांची भेट ठरली होती, पण भेट संपायला आली असताना कुलभूषण आणि त्याच्या आई-पत्नीने थोडा वेळ आणखी देण्याची विनंती केली. त्यावर त्यांची विनंती मान्य करत दहा मिनीटं वेळ वाढवण्यात आली अशीही माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
ही शेवटची भेट नाही -
कुलभूषण जाधव यांची त्यांच्या नातेवाईकांसोबतची ही शेवटची भेट म्हणावी का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, या भेटीला शेवटची भेट म्हणता येणार नाही, ही पूर्णपणे केवळ मानवतेच्या दृष्टीने झालेली भेट होती. असं सूचक वक्तव्य पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.