सध्या देशाचं इंग्रजीमधील इंडिया हे अधिकृत नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेला जोर आला आहे. इंडियाचं भारत असं नामांतर करण्याच्या चर्चेदरम्यान, संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव आला तर आम्ही यावर विचार करू. जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत नावाचं पत्र व्हायरल झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली होती.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटारेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांना जर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या नामांतराचा प्रस्ताव आला तर काय होईल, असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, जर अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. तसेच त्यांनी सांगितले की, तुर्कीकडून त्या देशाचं नाव बदलून तुर्कीए करण्याचा प्रस्ताव आळा होता. त्यावर संयुक्त राष्ट्रांनी आपली औपचारिक अनुमती दिली होती, याचंही उदाहरण त्यांनी दिलं.
फरहान हक यांनी इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या येत असलेल्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तुर्कीएबाबत तेथील सरकारने आम्हाला केलेल्या औपचारिक विनंतीनंतर ही कारवाई पुढे केली गेली. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारची विनंती केली गेल्यात आम्ही त्यावर विचार करू.
दरम्यान, भारतामध्ये विरोधी पक्ष इंडिया हे नाव हटवण्यास विरोध करत आहेत. जी-२० देशांच्या निमंत्रण पत्रिकेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यातील प्रेसनोटवरही प्राईम मिनिस्टर ऑफ भारत लिहिलं गेलं आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ते शेअर केलं आहे. तर जी-२०च्या भारती डेलिगेट्सच्या ओळखपत्रांवरही याच शब्दांचा उल्लेख आले.