ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. ५ - पती उंच नसल्याने सौदी अरेबियात एका महिलेने थेट घटस्फोट मागितला आहे. पती माझ्यापेक्षा उंचीने कमी असल्याने सर्वांसमोर नाचक्की होते असे या महिलेचे म्हणणे असून सौदी अरेबियामध्ये या घटस्फोट प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सौदी अरेबियात राहणा-या २० वर्षीय तरुणीचा सात महिन्यांपूर्वी एका तरुणाशी निकाह झाला होता. या तरुणीने आता पूर्व सौदीतील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे घटस्फोटासाठी उंची हे कारण ठरले आहे. पतीची उंची कमी असल्याने बाहेर गेल्यावर उंचीवरुन सर्वजण आमची खिल्ली उडवतात. हा प्रकार मला आता असह्य होत असल्याने घटस्फोट हवा असल्याचे महिलेने म्हटले आहे. फक्त उंचीमुळे घटस्फोट घेण्याच्या महिलेच्या निर्णयावर सोशल मिडीयांनी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्षुल्लक कारणावरुन घटस्फोट घेण्याची ही सौदीतील पहिलीच घटना नाही. यापूर्वी एका तरुणाने पत्नीने स्वतःचा गाडी चालवतानाचा व्हिडीओ पाठवल्याने तिच्याशी घटस्फोट घेतला होता.