लंडन : अनेक देशांची गोपनीय कागदपत्रे उघड करणारा व त्यामुळे अमेरिकेचा रोष ओढवून घेतलेला विकिलिक्सचा सहसंस्थापक ज्युलियन असांज याला इक्वेडोर देशाच्या लंडनमधील दूतावासातून स्थानिक पोलिसांनी अटक केली. इक्वेडोरने राजाश्रय दिल्याने व अटक टळावी म्हणून असांज या दूतावासात गेल्या सात वर्षांपासून राहात होता.
इक्वेडोरने असांजला दिलेला राजाश्रय काढून घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ज्युलियन असांजने २०१० साली विकिलिक्सवर अनेक गोपनीय कागदपत्रे झळकवली होती. त्यामध्ये विविध नेत्यांची संभाषणे व अन्य महत्त्वाच्या माहितीचा समावेश होता. या कागदपत्रांतून अमेरिकेची गोपनीय माहिती उघड झाल्याचा त्या देशाचा आक्षेप होता. त्यामुळे असांजला अटक करण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले होते. त्याला २०१८ साली इक्वेडोरचे नागरिकत्वही मिळाले होते.
बलात्काराचा खटला पुन्हा चालवाअसांजचा छळ होईल किंवा त्याला देहदंडाची सुनावली जाण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही देशामध्ये त्याचे प्रत्यार्पण केले जाणार नाही असे इक्वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी म्हटले आहे. ब्रिटिश सरकारनेही आपल्याला तसे लेखी आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. असांज याच्यावरील बलात्काराचा खटला नव्याने चालविण्यात यावा अशी मागणी त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने तिच्या वकिलामार्फत केली आहे. हे बलात्कार प्रकरण २०१० साली घडले आहे.