नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक घोषणा केली आहे. ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांनी आपले माजी सुरक्षा कर्मचारी ॲलेक्सी ड्युमिन यांना सल्लागार राज्य परिषदेचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे आता ॲलेक्सी ड्युमिन हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सल्लागारांपैकी एक असतील. या नियुक्तीनंतर व्लादिमीर पुतिन हे ॲलेक्सी ड्युमिन यांना आपला उत्तराधिकारी बनवू शकतात, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
ॲलेक्सी ड्युमिन यांच्या नियुक्तीबाबतचा आदेश बुधवारी क्रेमलिनच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, त्यात ॲलेक्सी ड्युमिनबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आणि सल्लागार सर्गेई मार्कोव्ह म्हणाले की, ॲलेक्सी ड्युमिन यांच्या नियुक्तीची चर्चा रशियामध्ये खूप वेगाने होत आहे. तसेच, याकडे असेही पाहिले जात आहे की, ॲलेक्सी ड्युमिन हे रशियाचे भावी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांची निवड व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. म्हणजेच व्लादिमीर पुतिन यांनी ॲलेक्सी ड्युमिन यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्याची चर्चा जगभर आहे.
ॲलेक्सी ड्युमिन यांचा जन्म १९७२ मध्ये कुर्स्क (पश्चिम रशिया) येथे झाला. त्यांना एक मुलगा आहे. १९९५ मध्ये ते फेडरल गार्ड्स सर्व्हिस (FSO) मध्ये सामील झाले. १९९९ पासून ॲलेक्सी ड्युमिन यांनी व्लादिमीर पुतिन यांचे पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात अंगरक्षक म्हणून काम केले. २०१२ मध्ये ॲलेक्सी ड्युमिन यांना प्रेसिडेंशियल बॉडी गार्डचे उपप्रमुख बनवण्यात आले. २०१४ मध्ये त्यांना रशियन लष्करी गुप्तचर विभागाचे उपप्रमुख बनवण्यात आले. वृत्तानुसार, क्रिमियावर कब्जा करण्यामागे लेक्सी ड्युमिन यांचे नाव आहे.
दरम्यान, ॲलेक्सी ड्युमिन यांना नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर ते रशियाचे पुढील राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत क्रेमलिनने सांगितले की, हे रोटेशन प्रक्रियेअंतर्गत घडले आहे. ॲलेक्सी ड्युमिन हे ७२ वर्षीय इगोर लेव्हिटिन यांच्याकडून पदभार स्वीकारतील. दुसकरीकडे, व्लादिमीर पुतिन हे जेव्हाही कोणाची नियुक्ती करतात, तेव्हा ती जगभरात खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ॲलेक्सी ड्युमिन हे राष्ट्राध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार असू शकतात, असे मानले जात आहे.