चीन कधी कोणाशी पंगा घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे हा देश सतत युद्धाची तयारी करतच असतो. चीनने आतापर्यंत त्यांच्या सीमेला लागून असलेल्या अनेक देशांशी पंगा घेतला आहेच. आता थेट अमेरिकेशी भिडण्याची तयारी चीनने सुरू केल्याचे समोर आले आहे. चीनने तसा सरावही सुरू केला असून, अमेरिकेचे युद्धनौका कशी उडवता येईल, याची प्रत्यक्ष चाचपणीही सुरू केली आहे.
चीन असा काही खेळ खेळतोय याचे चित्र सॅटेलाइटने टिपले आहे. मॅक्सार टेक्नॉलॉजीने हे सॅटेलाइट चित्र समोर आणले आहे. चीनने कोणालाही कळू नये यासाठी त्यांच्या वायव्य भागातील वाळवंटात अमेरिकी युद्धनौका आणि डिस्ट्रॉयरचे मॉडेल्स तयार केल्याचे सॅटेलाइटमधून दिसून आले आहे. ही युद्धनौका आणि डिस्ट्रॉयरला कसे उद्ध्वस्त करता येईल, याचा सराव या वाळवंटात चिनी सैनिक करत आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, चीन आता अमेरिकेच्या नौदलाशी भिडण्याची तयारी करत आहे.
कुठे आहे तणावाचे ठिकाण
अमेरिका आणि चीन यांच्यातील अंतर खूप असले तरी तीन ठिकाणी या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
दक्षिण चीन समुद्र
दक्षिण चीन समुद्र भागावर कब्जा करण्याचा चीनचा मानस आहे. त्या दृष्टीने चीनने आतापर्यंत अनेक प्रयत्न करून झाले आहेत. त्यासाठी चीन छोट्या देशांना दमबाजी करत आहे. याच भागात अमेरिकेने आपली युद्धनौका रोनाल्ड रिगन उभी केली आहे.
तैवान
चीनला तैवान ताब्यात हवा आहे. त्यासाठी युद्धाची तयारी आहे; पण अमेरिका तैवानच्या बाजूने उभी आहे.
हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र
राजकीय उलथापालथीचे हे केंद्र बनले आहे. चीनला या क्षेत्रात मात देण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊ शकतात.